चिरंजीवीसोबत झळकणार मालविका
प्रभाससोबत ‘द राजा साब’ चित्रपटात दिसून येणारी दक्षिणेतील सुंदर अभिनेत्री मालविका मोहनन आता मेगास्टार चिरंजीवीसोबत मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसून येणार आहे. दिग्दर्शक बॉबी कोली यांचा पुढील चित्रपट ‘मेगा 158’मध्ये मेगास्टार चिरंजीवी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात दोन अभिनेत्रींची निवड करण्यात येणार असून यात मालविकाचे नाव ठरले आहे.
केरळची रहिवासी असलेली मालविका मोहनन ही प्रसिद्ध सिनेमेटॉग्राफर के. यू. मोहनन यांची कन्या आहे. तिने 2013 मध्ये मल्याळी चित्रपट ‘पट्टम पोल’द्वारे अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर तिने तमिळ, हिंदी आणि मल्याळी चित्रपटात अनेक भूमिका साकारल्या आहेत.
मास्टर (विजयसोबत), पेट्टा (रजनीकांत यांच्यासोबत), मारन (धनुषसोबत) आणि थंगालान (विक्रमसोबत) यासारख्या चित्रपटांमुळे तिने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आता तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत मालविका स्वत:ची नवी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चिरंजीवीसोबत काम करण्याची संधी मिळणे तिच्या कारकीर्दीचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. मालविका याचबरोबर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करू पाहत आहे.