मालविका बनसोड पराभूत
वृत्तसंस्था/ सारब्रुकेन (जर्मनी)
2024 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे सुरु असलेल्या हायलो खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची महिला बॅडमिंटनपटू मालविका बनसोडचे आव्हान डेन्मार्कच्या ब्लिचफेल्टने संपुष्टात आणत जेतेपद पटकाविले.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सुपर 300 स्पर्धेत खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टने मालविका बनसोडचा 21-10, 21-15 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत मालविका बनसोडने डेन्मार्कच्या जुली जेकॉबसनचा पराभव करुन पुढील फेरी गाठली होती.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या या स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठणारी मालविका बनसोड ही तिसरी भारतीय बॅडमिंटनपटू असून यापूर्वी सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांनी असा पराक्रम केला होता. दोन वर्षापूर्वी झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत 23 वर्षीय मालविकाने उपविजेतेपद पटकाविले होते. डेन्मार्कच्या ब्लिचफेल्टने हा अंतिम सामना 43 मिनिटात जिंकला. गेल्या वर्षी या स्पर्धेत मालविकाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्यफेरी गाठणाऱ्या लक्ष्य सेनने 2019 साली हायलो बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद पटकाविले होते.