For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्याच्या राजकारणाला मालवणी तडका!

06:22 AM Nov 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्याच्या राजकारणाला मालवणी तडका
Advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांची ठिकठिकाणी परस्परांमध्ये जुंपलेली आहे. राज्यात तीन नगराध्यक्ष बिनविरोध करताना भाजपने आपल्या मित्र पक्षांनाही दुखावले. इतर अनेक ठिकाणी टोकाचे वाद झाले पण चर्चेत आला तो मालवणी तडका. मालवण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी भाजप नेते किनवडेकरांच्या घरात केलेले स्टिंग ऑपरेशन आणि त्यानंतर मला युती दोन तारखेपर्यंत टिकवायची आहे असे भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आधीच उकडून, भरघोस तेल मीठ लावून उकळत ठेवलेल्या सत्तेच्या  कालवणाला मालवणी तडका मिळाला. सत्ता कोणालाही सोडायची नाही पण एकमेकांच्या डोक्यात नारळ फोडणे या निमित्ताने साधले जात आहे. त्यात निलेश आणि नारायण राणे आधीपासूनच टार्गेटवर होते.....स्टिंग ऑपरेशनमुळे तळकोकणातील वातावरण चांगलेच तापले असले तरी या प्रकाराचा फटका येणाऱ्या काळात मुंबई, ठाणे आणि कोकणातील अनेकांना बसणार आहे.

Advertisement

राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष त्यात ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी असली तरी निलेश राणे यांची भूमिका त्यांना मान्य असावी कारण ती त्यांच्या बंडखोर वृत्तीप्रमाणे आहे. पण कोकणात पैसा वाटण्याच्या प्रकारावर राणेंच्या घरातून झालेला आरोप लोकांना 90 च्या दशकात समाजवादी, जनता दल व इतर नेते करत असलेल्या आरोपांची आठवण करून देत आहे! काळानुसार पात्रे बदलली इतकेच! यातून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जळगाव दौऱ्यात ‘युती दोन तारखेपर्यंत टिकवायची आहे,’ असे वक्तव्य करून राणेंना अधिक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

खरं तर, गेल्या आठ दिवसांत राज्यभर राजकीय रणधुमाळी उडाली आहे. सत्ताधारी महायुतीतील भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादीचा एकमेकांविरुद्ध शह-काटशह चालू आहे. ठिकठिकाणी परस्परांमध्ये जुंपली असून, तीन नगराध्यक्ष बिनविरोध करताना भाजपने मित्रपक्षांनाही दुखावले. जळगाव जिह्यातील जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या बिनविरोध निवडून आल्या. इथे शिंदे सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत तिकीट दिलेल्या महिलेने माघार घेतली हे विशेष. धुळे जिह्यातील दोंडाईचा मध्ये रावल परिवाराचे महत्त्व असले तरी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्रीसह 26 सदस्य बिनविरोध झाले. या गावात एकही पक्षाचा उमेदवार टिकला नाही हे पहिल्यांदाच घडले. सगळ्यात वादग्रस्त ठरली ती सोलापूर जिह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक. उज्वला थिटे या महिलेवरील अन्यायाला फुटलेली वाचा आणि माजी आमदार राजेश पाटील यांच्या पुत्रांकडून अजित पवारांना वापरलेला अपशब्द राज्यभर चर्चेत आला. नुकताच अजित पवारांनी सोलापूर दौऱ्यात त्याचा ओझरता उल्लेख करून आपण पाटील पुत्रांच्या माफीनाम्यानंतरही विसरलो नसल्याचे दाखवून दिले. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाची बिनविरोध निवड विरोधकांनी मुद्दा बनवला. अर्थात महाविकास आघाडीचे अनेक नेते आपापल्या जिह्यात आणि मतदारसंघातील नगरपालिकांच्या निवडणुकीत अडकून पडल्याचे यावेळी स्पष्ट झाले आणि त्यांच्याकडे अर्थबळच नव्हे तर मनुष्यबळही तोकडे आहे, असलेले नेते विरोधात फिरायला तयार नाहीत याची जाणीव झाली. मुठभर नेते फिरत आहेत काही नेत्यांना अनाकलनीयरित्या गप्प बसवले गेले आहे. त्यांची त्या त्या पक्षातील घुसमट वेगळीच आहे. मात्र असे असले तरी येत्या चार दिवसात भाजपलाही संपूर्ण राज्य पिंजून काढणे शक्य नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक नेते दौरा करत असले तरी त्यांचाही प्रचार तोकडा पडतोय. एकाच वेळी इतक्या निवडणुका राजकारणाला उलटेपालटे करत आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात महायुतीची फूट दिसू लागली आहे. 13 नोव्हेंबरला भाजप आणि अजित पवार गटाने युतीची घोषणा करून शिंदे सेनेला धक्का दिला. भाजप 41 तर राष्ट्रवादीने 8 जागांवर आपली भूमिका निश्चित केली तरी शिंदे सेना युतीची वाटाघाटी सुरू असल्याचे सांगत होती. मध्यंतरी मुंबई दिल्लीत खूप मोठे राजकारण घडले. नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत शिंदे आणि अजित पवार एकत्र आले. 17 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती-महाविकास आघाडीचे युतीचे चित्र स्पष्ट झाले. हिंगोलीत भाजपला मोठा धक्का बसला, जिथे उमेदवाराने माघार घेतली. इथे गुरुवारी रात्री शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या घरावर छापा पडला आहे. याच दरम्यान शिंदे सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले,  ‘शिवसेनेवर टीका करणाऱ्यांनी निवडणुकीत स्वत:ला आजमावून पाहावे. सत्ता पक्षांची विरोधी पक्षांशी हातमिळवणीही अनेक शहरांमध्ये रंगलेली आहे. शरद पवार गटाने शिंदे आणि अजित पवारांसोबत युतीची तयारी दाखवली, पण भाजपशी नाही. ठाणे महापालिकेत महाविकास आघाडीने एकजूट दाखवली, तर काँग्रेस-राष्ट्रवादी युतीतही नवी समीकरणे घडली. भाजपमध्ये या धामधुमीतही खासदार नारायण राणे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न दिसले. शिवाय कुठे अजित पवारांना शिंदे सेनेने ‘राजीनामा द्या’ असा अल्टिमेटम दिला, तर कुठे महायुतीत तुफान फटकेबाजी सुरू झाली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मालवण स्टिंगला ‘बेडरूमपर्यंत पोहोचले’ असा उपहास केला. हा वाद राणेंच्या इतकाच एकनाथ शिंदे यांच्याशीही आहे. कल्याण-डोंबिवली आणि ठाणे जिह्यात विरोध टोकाला पोहोचला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप-शिवसेना युती तुटण्याची शक्यता आहे. ठाण्यात नरेश म्हस्के आणि संजय केळकर यांच्यात वाकयुद्ध सुरूच आहे. त्यात भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने हल्ला झाला, त्याचे शिंदे सेना कार्यकर्त्यावर आरोप आहेत. अशातच डोंबिवली खोनी ग्रामपंचायतीत ठाकरे गटाने धमाल माजवली, श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. यामुळे शिंदे सेनेला धक्का बसला.

Advertisement

राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून एकमेका विरोधातील कुरघोड्या स्पष्ट होऊ लागल्या आहेत. खुद्द भाजपा अंतर्गतसुद्धा त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात नोटांचे बंडल नेहमीच वेगवेगळ्या लोकांचे काटे काढण्यास उपयोगात येतात. शिंदे सेनेने विधानसभेला बहुजन विकास आघाडीच्या मदतीने वसई विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांना अडचणीत आणले होते, नोटांच्या बंडलचे हे प्रकरण मिटते ना मिटते तोपर्यंत शिंदे सेनेच्या अर्जुन खोतकर यांना एका शासकीय समितीच्या दौऱ्यात माजी आमदार अनिल गोटे यांनी नोटांनी भरलेल्या बॅगांची खोली दाखवून अडचणीत आणले. या प्रकरणाचे पुढे काय झाले? त्यानंतर नव्याने नोटांचा बंडल दिसला तो मालवणात. भाजप प्रदेशाध्यक्ष दौरा करून जातात आणि येताना ते आणलेले पैसे कार्यकर्त्यांना देऊन जातात ते पैसे मतदारांना वाटले जातात हे दाखवण्याचा झालेला हा प्रयत्न.. राजकीय कालवणाला तडका म्हणता येईल असाच. पण, ठसका लागला म्हणून भरलेले ताट सोडून जायचे धाडस आजच्या काळात तरी कोणी दाखवत नाही! हेही तितकेच खरे. त्यामुळे आज जरी टोकाचे वक्तव्य होत असले तरी भविष्यात हे प्रकरण गोडीगुलाबीने सोडवले गेल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.