उद्घाटना आधीच मालवण एसटी स्टँड इमारतीच्या दर्शनी भागाचे नुकसान
मालवण / प्रतिनिधी
मालवण बस स्थानकावरील जुनी वादग्रस्त इमारत जमीन दोस्त करण्याची कार्यवाही सुरू असताना जमीनदोस्त करण्यात येणाऱ्या इमारतीचा काही भाग नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर कोसळल्याने दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी सदरचे काम सुरू असताना एसटी महामंडळाचे प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याची चर्चा बस स्थानक परिसरात होती. मालवण बस स्थानकाची जुनी इमारत जमीनदोस्त करण्याची कार्यवाही गेले चार दिवस सुरू आहे. आज सकाळी यातील इमारतीचा अखेरचा काही भाग तोडण्याचे काम सुरू असताना त्या इमारतीचा तोडलेला भाग नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर कोसळला आणि त्या ठिकाणी करण्यात आलेले छप्पर कोसळले. यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी नवीन इमारतीचे नुकसान झाले आहे.
दारूच्या बाटल्यांचा खच
एसटी महामंडळाच्या मालवण बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले नसले तरी सध्या या इमारतीमध्ये कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांचे राहणे सुरू झाले आहे. या इमारतीच्या टेरेसवर दारूच्या बाटल्यांचा खच आणि इतर साहित्य पडल्याचे दिसून आले होते. यामुळे उद्घाटनाच्या अगोदरच इमारतीची झालेली दुर्दशा पाहून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
पहिल्याच पावसात गळती
इमारतीचे अद्याप उद्घाटन झालेले नसले तरी काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे इमारतीला गळती लागली होती. त्यामुळे नवीन रंग काढलेल्या ठिकाणी पाणी साचून राहिल्याचे दिसून आले होते . यामुळे इमारतीच्या बांधकामात अनेक त्रुटी असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी एसटी प्रशासन गांभीर्याने कारवाई करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
पार्सलचे ऑफिस अडकलं
एसटी महामंडळ कडून पार्सल सेवेसाठी देण्यात आलेल्या कक्षाच्या बाहेर अडचण करून ठेवण्यात आल्याने राजसर सेवेसाठी येणाऱ्या ग्राहकांना आणि प्रवाशांना अनेक अडचणीतून जावे लागत आहे. एसटी प्रशासनाला याबाबत संबंधितांकडून वारंवार सूचना करूनही त्यांच्यासमोर ही अडचण आणि अडगळ बाजूला करण्यात आलेली नव्हती यामुळे या निमित्ताने याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच अपघात
मालवण बस स्थानकाची जुनी इमारत जमीनदोस्त करणे क्रमबाप्त असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने दोन वेळा अपघात होऊन प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या . आता इमारत जमीन दोस्त होत असताना त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित राहून काम करून घेणे आवश्यक होते. मात्र याबद्दल कोणतेही अधिकारी ,आगार कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने ठेकेदाराकडून काम लवकर उरकण्याच्या घाईत सदरची इमारत तोडण्यात येत असताना ही दुर्घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.