राजकोटसह संपूर्ण मालवणला उच्च दाबाने मुबलक पाणी देणार; विरोधकांनी दिशाभूल थांबवावी : सभापती सहदेव बापार्डेकर
धामापूर नळपाणी योजनेच्या प्रस्तावित पाण्याच्या टाकीच्या जागेवरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना बापार्डेकर म्हणाले की, विकासकामांवर निराधार आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी आपल्या पराभवाचे आत्मचिंतन करावे. विकास करण्याची क्षमता नसल्याचे जनतेने निवडणुकीत दाखवून दिले आहे. त्यामुळे चुकीची माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी सांगितले.
राजकोट परिसरातील प्रत्येक नागरिकाला उच्च दाबाने आणि मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी उंच ठिकाणी पाण्याची टाकी उभारणे आवश्यक आहे. या टाकीतून राजकोट परिसराला स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मालवण शहरातील विविध भागांनाही स्वतंत्र जलवाहिन्यांच्या माध्यमातून सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक प्रयत्नशील आहेत.
प्रशासन आणि संबंधित यंत्रणेमार्फत आवश्यक सर्वेक्षण करून कुंभारमाठ येथील उंच भागातील जागा पाण्याच्या टाकीसाठी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरू असून, आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील काम हाती घेण्यात येणार आहे. तांत्रिक बाबींचा विचार करून संबंधित तज्ज्ञ आणि प्रशासकीय यंत्रणा अंतिम निर्णय घेणार असल्याचे बापार्डेकर यांनी स्पष्ट केले.
पाण्याची टाकी एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविल्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे तसेच अन्य चुकीचे दावे करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांनी थांबवावा. जनतेच्या हिताच्या दृष्टीने सुरू असलेल्या विकासकामांमध्ये सहकार्य करता येत नसेल, तर किमान विकासप्रक्रियेत अडथळे निर्माण करू नयेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
राजकोट परिसरातील सर्व भागांना स्वतंत्र जलवाहिनीद्वारे उच्च दाबाने मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार आवश्यक कार्यवाही सुरू आहे. मालवण शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे हे नगरपरिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
मालवणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे. पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर राजकारण करण्याऐवजी शहराच्या हिताला प्राधान्य द्यावे. राजकोटसह संपूर्ण मालवण शहराला मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया तांत्रिक निकष आणि प्रशासकीय मंजुरीनुसार पूर्ण केली जाईल. विरोधकांनी चुकीची माहिती पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे सहदेव बापार्डेकर यांनी स्पष्ट केले.
