For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवणच्या प्राप्ती सावंतचे नेदरलँड्समध्ये विक्रमी यश; 9.6 गुणांसह विद्यापीठात सर्वोच्च स्थान;अंतराळ संशोधन क्षेत्रात पीएच.डी. करण्याची इच्छा

11:19 AM Sep 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
मालवणच्या प्राप्ती सावंतचे नेदरलँड्समध्ये विक्रमी यश  9 6 गुणांसह विद्यापीठात सर्वोच्च स्थान अंतराळ संशोधन क्षेत्रात पीएच डी  करण्याची इच्छा
Advertisement

मालवण, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणची कन्या प्राप्ती प्रसाद सावंत हिने नेदरलँड्समधील प्रसिद्ध ट्वेंटे विद्यापीठात  उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी करत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. भू-माहिती विज्ञान आणि पृथ्वी निरीक्षण  या पदव्युत्तर अभ्यासक्रमात तिने 9.6 गुण मिळवत विक्रमी यश संपादन केले आहे.

Advertisement

पृथ्वीविज्ञानासाठी उपयोजित दूरसंवेदन (Applied Remote Sensing for Earth Sciences) या विशेष विषयात प्राप्तीने विद्यापीठात सर्वोच्च स्थान मिळवले. तिच्या या यशामुळे मालवणसह सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रात तिचे विशेष कौतुक होत आहे.

प्राप्तीने नुकताच दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. यावेळी तिने विद्यापीठातील यापूर्वीचा 9.2 गुणांचा विक्रम मागे टाकत 9.6 गुणांची नोंद केली.

Advertisement

तिने ‘झुइडवाल गुरुत्वीय-चुंबकीय विसंगतीचे द्विमितीय प्रतिमान प्रक्रियेद्वारे मूल्यमापन’ या विषयावर प्रबंध सादर केला. तिच्या संशोधनातून पृथ्वीविज्ञान, दूरसंवेदन आणि भू-माहिती विज्ञान या क्षेत्रांतील तिची भक्कम शैक्षणिक तयारी अधोरेखित झाली आहे.

प्राप्ती ही मूळची मालवणची असून कुणकवळे हे तिचे मूळ गाव आहे. मालवण येथील रोझरी इंग्रजी माध्यम शाळेत चौथीपर्यंत तिचे शिक्षण झाले. त्यानंतर तिने पुण्यातील भारती विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. अकरावी आणि बारावीचे शिक्षण पुण्यातील जाधवर महाविद्यालयात पूर्ण केले.

प्राप्तीच्या शैक्षणिक वाटचालीला कुटुंबातील शैक्षणिक पार्श्वभूमीचीही साथ लाभली आहे. तिच्या आई टोरोंटो विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांनी तेथेच पीएच.डी. पूर्ण केली आहे.

प्राप्तीला लहानपणापासूनच अंतराळ आणि अंतराळ संशोधनाशी संबंधित विषयांमध्ये विशेष रस असल्याचे तिचे वडील प्रसाद सावंत यांनी सांगितले. भविष्यात अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात पीएच.डी. करण्याची तिची इच्छा असून, आपल्या संशोधनातून या क्षेत्रात योगदान देण्याचा तिचा मानस आहे.

नेदरलँड्समधील ट्वेंटे विद्यापीठातील विक्रमी कामगिरीमुळे प्राप्तीने मालवणच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्राची मान उंचावली असून, तिच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.