मालवण बंदर जेटीवर बेवारस बॅग आढळल्याने खळबळ; पोलिसांचे मॉकड्रिल, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी
डीवायएसपी दीपक शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने जुन्या जेटीवर उपस्थित असलेल्या पर्यटकांना सुरक्षित अंतरावर हलविण्यात आले. तसेच संपूर्ण परिसर रिकामा करून सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या.
यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने आवश्यक साधनसामग्रीच्या साहाय्याने संशयित बॅगेची तपासणी केली. स्फोटक पदार्थांचा संभाव्य धोका तपासून नियोजित प्रक्रियेनुसार बॅग सुरक्षितपणे हाताळण्याची कार्यवाही करण्यात आली.
या मॉकड्रिलच्या माध्यमातून संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी कोणती पावले उचलावीत, घटनास्थळावरील नागरिकांना सुरक्षित कसे हलवावे आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
या बॉम्ब शोधक व नाशक पथकामध्ये पीएसआय संजय साटम, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय शिर्टीकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुकन्या पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन मोईन यांनी सहभाग घेतला.
संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना कळवा!
सार्वजनिक ठिकाणी बेवारस बॅग किंवा अन्य संशयास्पद वस्तू आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित अंतर राखावे. वस्तूला हात लावणे, उघडणे किंवा हलविणे टाळावे. तातडीने डायल 112 किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. नागरिकांची सतर्कता आणि वेळेवर दिलेली माहिती संभाव्य धोका टाळण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, हा संदेश या मॉकड्रिलमधून देण्यात आला.
