For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवणच्या फोवकांडा पिंपळ येथे फटाक्यांच्या ठिणग्यांनी बंद घराला आग; दोन लाखांचे साहित्य जळून खाक

12:21 PM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
मालवणच्या फोवकांडा पिंपळ येथे फटाक्यांच्या ठिणग्यांनी बंद घराला आग  दोन लाखांचे साहित्य जळून खाक
Advertisement

मालवण : मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ परिसरात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे बंद घराला आग लागून सुमारे दोन लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उशिरा घडली. नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

Advertisement

मेढा भागातून 19 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन सुरू असताना मिरवणुकीत फटाके फोडण्यात येत होते. यावेळी फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे गणेश कुशे यांच्या बंद घराला आग लागल्याचे स्थानिकांनी सांगितले. घरात इमारतींसाठी जाळी बसविण्यासाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले होते. आगीने काही क्षणांतच या साहित्याला वेढले आणि मोठ्या प्रमाणात जाळी जळून खाक झाली.

आग वाढत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. त्यानंतर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देऊन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्याचा धोका टळला.

Advertisement

गणेश कुशे हे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी त्यांनीही स्थानिक नागरिकांसोबत प्रयत्न केले.

घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण आणि नगरसेवक ललित चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फटाक्यांमुळे ही आग लागल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. या दुर्घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे जाळीचे साहित्य जळून नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement
Tags :

.