मालवण समुद्रात मासेमारीची बोट बुडाली; दोघांचा बुडून मृत्यू, एकाची सुखरूप सुटका;दांडी परिसरात हळहळ



मालवण : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील खडकाळ समुद्र परिसरात मासेमारी करत असताना ‘सागरिका’ ही मासेमारी नौका समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत दोन मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाला असून, एका मच्छिमाराला स्थानिक मच्छिमारांनी सुखरूप बाहेर काढले.
मालवणच्या दांडी येथील नौका मालक सन्मेश सुरेश परब, त्यांचा मुलगा सुयोग सन्मेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे हे तिघे ‘सागरिका’ नौकेतून मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात मासेमारी सुरू असताना अचानक समुद्राच्या लाटांचा जोर वाढला आणि नौका बुडाली.
नौका बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक मच्छिमारांनी बचावकार्य सुरू केले. यावेळी सुयोग परब यांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र नौका मालक सन्मेश परब आणि खलाशी अक्षय राणे यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.
दोन्ही मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच दांडी परिसरात शोककळा पसरली असून, मच्छिमार बांधवांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.