For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवण–धामापूर–कुडाळ बसफेरी बंद; प्रवासी, विद्यार्थ्यांचे हाल

मालवण–धामापूर–कुडाळ बसफेरी बंद  प्रवासी  विद्यार्थ्यांचे हाल
Advertisement

मालवण : मालवण आगारातून नियमितपणे सुरू असलेली मालवण–धामापूर मार्गे कुडाळ (रेल्वे स्टेशन) ही सकाळची बसफेरी काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरील प्रवासी व विद्यार्थी वर्गाला मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या बसफेरीला चांगले भारमान मिळत असतानाही सेवा बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement

मालवण आगारातून दररोज सकाळी १०.३० वाजता ही बस कुडाळ रेल्वे स्टेशनच्या दिशेने रवाना होते. धामापूरसह मार्गावरील विविध गावांतील प्रवाशांसाठी ही बसफेरी सोयीची ठरत होती. विशेषतः कुडाळ रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी तसेच पुढील प्रवासासाठी अनेक प्रवासी या बससेवेवर अवलंबून आहेत. मात्र, ही फेरी बंद असल्याने प्रवाशांना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

कुडाळहून मालवणच्या दिशेनेही या बसची दुपारी १२ वाजताची परतीची फेरी नियमित होती. त्यामुळे सकाळी मालवणहून कुडाळकडे जाणारे तसेच दुपारी कुडाळहून मालवणकडे परतणारे प्रवासी यांना या सेवेचा मोठा फायदा होत होता. रेल्वेने पुढील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही मालवण–कुडाळ रेल्वे स्टेशन जोडणारी ही बसफेरी महत्त्वाची मानली जाते.

Advertisement

या मार्गावर नियमित प्रवाशांची संख्या मोठी असून, बसफेरीला चांगले भारमान व उत्पन्न मिळत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ही फेरी बंद ठेवण्यामागील नेमके कारण काय, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. आगार व्यवस्थापनाने प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी होत आहे.

मालवण–धामापूर–कुडाळ रेल्वे स्टेशन हा ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील नियमित बससेवा विस्कळीत झाल्यास त्याचा थेट परिणाम दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थी, नोकरदार आणि रेल्वे प्रवाशांवर होतो. त्यामुळे मालवण आगाराने सकाळी १०.३० वाजताची मालवणहून कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणारी तसेच कुडाळहून दुपारी १२ वाजताची परतीची बसफेरी तातडीने पूर्ववत करून नियमित सुरू ठेवावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Advertisement
Tags :

.