For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवणातील नशाखोरी, अवैध धंदे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार

04:48 PM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
मालवणातील नशाखोरी  अवैध धंदे  नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार  उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार
Advertisement

मालवण : परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार यांनी मालवण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच अवैध धंदे, नशाखोरी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Advertisement

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकराव्या दिवसाच्या तसेच अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्याचे आवाहन शेलार यांनी केले. मिरवणुकांमध्ये डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर करू नये, असे निर्देशही त्यांनी दिले.

मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी काळात अवैध धंदे, बेकायदेशीर वाहतूक, अंमली पदार्थांचे सेवन व विक्री आणि नशाबंदीविरोधी विविध मोहिमा राबविण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांचे प्रथम समुपदेशन व जनजागृती करण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास संबंधित पालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा शेलार यांनी दिला.

शहरात अवैध धंदे किंवा नियमबाह्य वाहतूक सुरू असल्याची माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी मालवण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासन शेलार यांनी दिले.

“मालवण शहर स्वच्छ, निरोगी आणि नशामुक्त ठेवणे हे आमचे ध्येय आहे. सुरक्षित पर्यटनाचे वातावरण निर्माण करून शहराच्या विकासाला हातभार लावण्याचे नियोजन आहे,” असे दीपक शेलार यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस प्रशासन काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.