गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व विसर्जन व्यवस्थेचा आढावा
मालवण / प्रतिनिधी : आगामी गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, बाजारपेठेतील गर्दी, प्लास्टिक बंदी तसेच गणेश विसर्जनाच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मालवण तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्यात आली. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
गणेश विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी जिवरक्षकांची नियुक्ती करावी, विसर्जन मार्गांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत स्तरावर विसर्जनस्थळी स्वच्छता, पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी स्वतंत्र निर्माल्य संकलनाची व्यवस्था करावी, तसेच विसर्जनस्थळी स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठा आणि प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी वाहतूक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संवेदनशील ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस विभागाने योग्य नियोजन करावे, असे निर्देशही देण्यात आले.
याशिवाय गणेशोत्सव काळात शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. नागरिक, गणेश मंडळे आणि संबंधित यंत्रणांनी प्रशासनाला सहकार्य करून पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सव हा श्रद्धा आणि उत्साहाचा सण असल्याने सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कायदा-सुव्यवस्था राखत उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.