तब्बल आठ महिन्यानंतर मालपे बायपास महामार्ग खुला
पेडणे : पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 मालपे ते न्हयबाग हा बायपास रस्ता दरड कोसळल्यामुळे गेले आठ महिने बंद होता. हा रस्ता करत असताना डोंगरकापणी योग्य प्रकारे झाली नव्हती. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्याच पावसात रस्त्याची दरड कोसळली होती. त्यानंतर सरकारने दखल घेऊन दरड कोसळू नये म्हणून संरक्षण भिंत उभारण्यासाठी कामही सुरू केले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही संरक्षक भिंत उभारल्यानंतर जून 2024 साली या रस्त्यावरील च्या दोन्ही बाजूच्या दरडी कोसळून हा बायपास रस्ता पूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने पडलेली दरड काढण्याचे काम गेले सहा महिने सुरू होते. युद्धपातीवर हे काम सुरू करण्यात कंत्राटदाराने प्रयत्न सुरू होते. अखेर एका बाजूचा कोसळली दरड आणि माती तसेच रस्त्यावर पडलेला भराव काढून हा रस्ता अखेर वाहतुकीसाठी एकेरी मार्ग म्हणजेच मालपे ते पत्रादेवी या दिशेने जाण्यासाठी सुरू करण्यात आला. मात्र दुसऱ्या बाजूने पत्रादेवी ते पणजी जाण्याचा मार्ग अजूनही बंद आहे. तब्बल आठ महिन्यानंतर हा रस्ता एकेरी मार्गासाठी खुला करण्यात आला आहे.