पक्षफोडीची नाराजी मतदानातून उमटेल : मालोजीराजे प्रतिपादन
कोल्हापूर
देशाची वाटचाल हुकुमशाही, एकाधिरशाहीकडे सुरू आहे. मुठभर भांडवलदारांच्या कल्याणासाठी गरीबांकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वायत्त संस्थांचा फास आवळून कुटुंबे, पक्ष फोडले जात आहेत. भाजपच्या या कारभाराबद्दल जनतेत नाराजी असून ती मतदानाच्या रुपातून उमटणार असून इंडिया आघाडी, महाविकास आघाडीला जनता कौल देईल, असे प्रतिपादन मालोजीराजे यांनी केले.
राजारामपुरी येथे विविध ठिकाणी झालेल्या मिसळ पे चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजारामपुरीतील कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनीच शाहू महाराजांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
मालोजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांनी विकासाची दृष्टी ठेवून कोल्हापूर जिह्याचा विकास केला. शाहूंच्या समतेच्या विचारांवर शाहू छत्रपती कार्यरत असून छत्रपती घराणे हे संपत्तीचे वारस नसून विचारांचे वारस आहेत. इंडिया आघाडी, महाविकास आघाडीतील नेते आणि जनतेच्या रेट्यामुळे महाराजांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अनिल घाटगे म्हणाले, चारशे पार ची घोषणा करुन भाजप देशातील संविधान बदलण्याचा घाट घालत आहे. हा घाट मोडून टाकण्यासाठी इंडिया आघाडीने शाहूंना उमेदवारी दिली आहे. जनतेतून त्यांना उत्फुर्त पाठिंबा मिळत आहे.
महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून राज्याला कमजोर केले जात आहे, असा आरोप बाबा इंदूलकर यांनी केली. इतिहासात महाराष्ट्र जिंकण्यासाठी औरंगजेब आला होता. तीच पुनरावृत्ती लोकसभा निवडणूकीत दिसू लागली आहे. पण महाराष्ट्रातील जनता औरंगजेबी वृत्ती मोडून स्वाभिमान दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार, माजी नगरसेवक शिवाजी कवाळे, अनिल कदम, दुर्गेश लिंग्रस, शिवसेना महिला आघाडी प्रमुख माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, महिला काँग्रेस शहराध्यक्षा संध्या घोटणे, किशोर खानविलकर, हर्षल सुर्वे, रघुनाथ टिपुगडे, अनुप पाटील, महेश उत्तुरे, कमलाकर जगदाळे, दत्ता गायकवाड, उदय लिंग्रज आदी उपस्थित होते.