For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बळीचा बकरा होतील मल्लिकार्जुन खर्गे !

06:02 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
बळीचा बकरा होतील मल्लिकार्जुन खर्गे
Advertisement

यावेळी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचा पराभव होणार आहे. मात्र, या पराभवाचे उत्तरदायित्व राहुल गांधी आणि प्रियांका गांधींवर टाकले जाणार नाही. तर ते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर ढकलले जाईल. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना बळीचा बकरा बनविले जाईल, अशी खोचक टिप्पणी केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांनी केली आहे.

Advertisement

काँग्रेसची ही नेहमीचीच पद्धत आहे. तीच या लोकसभा निवडणुकीच्या मतगणनेनंतरही लागू केली जाईल. श्रेयासाठी पक्षश्रेष्ठी आणि पराभवाची जबाबदारी घ्यायला मात्र कार्यकर्ते, असा काँग्रेसचा नेहमीचा खाक्या असतो. याहीवेळी त्यापेक्षा वेगळे काही घडणार नाही, असे प्रतिपादन शहा यांनी केले. त्यांनी सोमवारी उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल भागात कुशीनगर, बलिया, चंदौली आदी मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभांमधून भाषणे केली.

पाच टप्प्यांमध्येच विजय निश्चित

Advertisement

या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय प्रथम पाच टप्प्यांच्या मतदानानंतरच निश्चित झालेला आहे. यासंबंधीची सर्व सविस्तर माहिती माझ्याकडे आहे. सहाव्या टप्प्याचे मतदान झालेले आहे. सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष अधिक मोठ्या विजयाजवळ गेलेला असेल. विरोधकांसाठी आता या निवडणुकीत काहीही उरलेले नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा निष्कलंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दहा वर्षे देशात सत्ताधीश आहेत. त्यापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून 13 वर्षे पदावर होते. या त्यांच्या प्रदीर्घ सत्ताकाळात त्यांची प्रतिमा निष्कलंक राहिलेली आहे. भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर नाही. तथापि, विरोधी पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. राहुल गांधीही अशाच एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सहारा उद्योगसमूहाच्या पैशावर समाजवादी पक्ष चालत असे. या सहारा घोटाळ्यात अडकलेले सर्वसामान्यांचे पैसे आमच्या सरकारने परत मिळवून दिले आहेत. समाजवादी पक्षाने त्याच्या राज्यात उत्तर प्रदेशात ‘एक जिल्हा, एक माफिया’ असे धोरण स्वीकारले होते. आता राज्यातील आमच्या सरकारने माफियांना चिरडले आहे. आता आम्ही ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ अशी नवी, उत्पादनांना प्रोत्साहन देणारी योजना लागू केली आहे. या योजनेमुळे उत्तर प्रदेशात रोजगार मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत, अशी भलावणही अमित शहा यांनी केली.

Advertisement
Tags :

.