मल्लिकार्जुन खर्गे-सिद्धरामय्यांच्या भेटीमुळे उत्सुकता
महत्त्वपूर्ण विषयांवर केली चर्चा : हनिट्रॅप प्रकरणाची चांगलीच खळबळ
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्याच्या राजकारणातील हनिट्रॅपच्या हंगामानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भेट घेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. मल्लिकार्जुन खर्गे आणि मंत्री प्रियांक खर्गे यांनी रविवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची बेंगळूर येथील कावेरी निवासस्थानी भेट घेतल्यामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे.
हनिट्रॅप प्रकरणात आमचा पक्ष आणि विरोधक जो कोणी असेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. खुद्द मंत्र्यांनी सभागृहात वक्तव्य केल्यानंतर सरकार गप्प बसणार नाही. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. विरोधकांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. याबाबत गृहमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून तपास कसा करायचा हे ठरवू. सर्व आमदार आणि मंत्र्यांना संरक्षण देणे आपले कर्तव्य आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास सर्व काही समोर येईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यापूर्वीच सांगितले होते.
हनिट्रॅप प्रकरणाने राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. हा मुद्दा काँग्रेसच्या गोटात चांगलाच चर्चेत आला आहे. सत्तावाटपाबाबत मोठ्या प्रमाणावर समर्थक-विरोधक विधाने ऐकायला मिळत असतानाच हनिट्रॅप प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
बहुतेक राजकीय मान्यवर आणि ज्येष्ठांनी सिद्धरामय्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. दरम्यान, रविवारी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सिद्धरामय्या यांची भेट घेतली, हे उत्सुकतेचे आहे. मंत्री के. एन. राजण्णा यांनी हनिट्रॅप घोटाळ्याबाबत विधानसभेत केलेल्या वक्तव्यावरही वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.