लय अवघड हाय गड्या समजाया बाप रं...! मल्हारपेठेतील वसंतराव हंकारे यांच्या कार्यशाळेत विद्यार्थी- पालक झाले भावूक
ग्रामपंचायत सदस्या स्वाती चौगले यांच्यावतीने केले होते आयोजन; 'बाप समजून घेताना' विषयावर अश्रू झाले अनावर
कोल्हापूर/ प्रतिनिधी
लहानपणी अंगाखांद्यावर खेळवणारा बाप आपली मुलगी मोठी झाल्यावर तिच्या मुक्तपणे वावरण्यावर काही अंशी निर्बंध आणतो. कोठे चाललीस, कोठून आलीस, यायला एवढा उशीर का झाला ? असे अनेक प्रश्न तो आपल्या मुलीला विचारत असतो. बापाच्या या बोलण्यामध्ये काळजी असते. म्हणजे तो निष्ठुर नसतो. पण काही मुलींना बापाचे हे वागणे पटत नाही. त्याचे आपल्यावर प्रेम राहिले नाही असे तीला वाटू लागते. पण पोरींनो तुम्ही ज्यावेळी लग्न मंडपातून तुमच्या नवऱ्याच्या घरी जाता, त्यानंतर घरी येऊन आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून घरातील तुमच्या वस्तू पाहून ढसाढसा रडणारा तो तुमचा बाप असतो. आपली लेक आता 'पाहुणी' झाली या विचाराने सर्वात दुःखी होणारा तुमचा बाप असतो. त्यामुळे पोरींनो 'लय अवघड हाय गड्या समजाया बाप रं...!' अशी भावनिक साद घालत प्रसिद्ध व्याख्याते वसंतराव हंकारे यांनी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक आणि ग्रामस्थांच्या अश्रुंना मोकळी वाट करून दिली.
मल्हारपेठ ( ता. पन्हाळा ) येथील ग्रामपंचायत सदस्य स्वाती कृष्णात चौगले यांनी जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील प्रसिद्ध व्याख्याते वसंतराव हंकारे यांची १४ ते २१ वयोगटातील मुले, मुली आणि पालकांसाठी विनामुल्य कार्यशाळा आयोजित केली होती. सरपंच शारदा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या कार्यशाळेमध्ये मल्हारपेठ परिसरातील सुमारे १३ शाळांतील सुमारे २ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
व्याख्याते हंकारे यांनी कार्यशाळेच्या सुरुवातीपासूनच उपस्थित विद्यार्थ्यांच्या काळजाचा ठाव घेतला. आपल्या जीवनात आई-वडिलांचे स्थान किती महत्वाचे आहे, आपली आई आपल्याला जन्म देण्यापासून मोठे करण्यापर्यत किती वेदना आणि कष्ट झेलते याची प्रत्येकाला जाणीव असणे आवश्यक असल्याचे हंकारे यांनी स्पष्ट केले. एखादी मुलगी दोन, चार महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या मुलग्याबरोबर जेंव्हा पळून जाते, तेंव्हा तीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा बाप कसा हतबल होतो. समाजात ताठ मानेने जगणाऱ्या बापाला लोकांच्या नजरा चुकवून कसे जावे लागते. साहेब माझ्या पोरीला शोधून काढा म्हणून पोलीसांसमोर गयावया कसा करत असतो याचे चित्र हंकारे यांनी विद्यार्थीनीसमोर उभे केले. असा बाप केवळ मरण येत नाही म्हणूनच जगत असल्याचे सांगून मुलांनो आपल्या आई-बापाला जपा. मोबाईल आणि सोशल मिडियामुळे तुम्ही तुमच्या आई- वडिलांपासून दुरावत चालला असल्याची जाणिव हंकारे यांनी करून दिली. त्यामुळे उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक आणि ग्रामस्थांच्या अश्रूचा बांध फुटला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रामपंचायत सदस्या स्वाती चौगले आणि पत्रकार कृष्णात चौगले यांनी वसंत हंकारे यांचे स्वागत केले. कृष्णात चौगले यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा आणि उद्देश स्पष्ट केला. ज्ञानराज हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी आभार मानले. यावेळी मल्हारपेठ परिसरातील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक, शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.