मळेवाड हेदुलवाडीत रिक्षा-बोलेरो पिकअपची जोरदार धडक; रिक्षाचालक गंभीर जखमी
न्हावेली : मळेवाड हेदुलवाडी येथील बँक ऑफ इंडिया शाखेसमोर रिक्षा आणि बोलेरो पिकअपमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली. विनायक रंगनाथ बाळे (40, रा. आजगाव-भोमवाडा) असे गंभीर जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनायक बाळे हे रेल्वे स्टेशनवरून मळेवाडच्या दिशेने रिक्षाने जात होते. मळेवाड हेदुलवाडी येथील बँक ऑफ इंडिया शाखेसमोर त्यांची रिक्षा आली असता समोरून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअपची रिक्षाला जोरदार धडक बसली. या धडकेनंतर रिक्षा पलटी झाली आणि बाळे रस्त्यावर कोसळले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या बाळे यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, बोलेरो पिकअपचा चालक आणि त्यातील एक प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच आरोंदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.