निवृत्तीच्या उंबरठ्यावरच मालेगाव मनपा आयुक्त जाधव पुन्हा एसीबीच्या जाळ्यात ! शनिवारी कामाचा शेवटचा दिवस होता
नाशिक: मालेगाव महानगरपालिकेच्या विकासकामांची देयके मंजूर करून ती आरटीजीएसद्वारे बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र शेषराव जाधव, त्यांचे स्वीय सहायक नीलेश वसंतराव पाटील आणि लेखापाल हरीश नथुराम डिंबर या तिघा संशयितांना अटक केली. न्यायालयाने संशयितांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, आयुक्त जाधव यांची सेवानिवृत्ती शनिवारी (३१ ऑक्टोबर) असून, तत्पूर्वी दोन दिवसांआधी त्यांच्यावर लाच प्रकरणी कारवाई झाली आहे.
"एसीबी' ने दिलेल्या माहितीनुसार, ४८ वर्षीय तक्रारदाराने मालेगाव महापालिकेकडील दोन विकासकामे पूर्ण केली होती. या कामांची बिले ठेकेदारांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी आयुक्त जाधव आणि पाटील यांनी एकूण बिलांच्या चार टक्क्यांनुसार ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने ९ जुलै २०२६ रोजी 'एसीबी'कडे यासंदर्भात रितसर तक्रार दाखल केली होती.
लाचेची मागणी निष्पन्न
'एसीबी 'च्या पथकाने १० व १३ जुलै रोजी पडताळणी केली असता, स्वीय सहायक पाटील याने बिलांच्या मंजुरीसाठी लाचेची मागणी करून त्यास सहमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले. २४ जुलै रोजी प्रत्यक्ष आयुक्त जाधव यांनी तक्रारदाराकडे बिलांपोटी चार टक्के लाचेची मागणी करून, रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर ती स्वीकारण्याचे स्पष्ट झाले.
