मालदीव तुर्कियेकडून खरेदी करणार घातक ड्रोन
वृत्तसंस्था/ माले
भारतीय सैन्याच्या तुकडीला देशाबाहेर पडण्याचा आदेश दिल्यावर मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारने भारतविरोधी देशांसोबत स्वत:चे संबंध मजबूत करण्याचे सत्र आरंभिले आहे. चीनसोबत अनेक करार केल्यावर मुइज्जू सरकार आता तुर्कियेसोबत घातक ड्रोन करार करणार आहे. मुइज्जू सरकारने तुर्कियेची कंपनी बायकरसोबत 3 कोटी 70 लाख डॉलर्सच्या एका करारावर स्वाक्षरी केली आहे. बायकर ही तुर्कियेचे अध्यक्ष एर्दोगान यांच्या जावयाची कंपनी आहे. पाकिस्तान देखील या घातक ड्रोनचा वापर करत आहे.
स्वत:च्या विशाल सागरी भागावर नजर ठेवण्यासाठी या सैन्य ड्रोनची खरेदी करत असल्याचे मालदीवच्या सरकारचे सांगणे आहे. मुइज्जू सरकारने या ड्रोन करारासाठी निधीही जारी केला आहे. यापूर्वी भारताने मालदीवला सागरी क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी डोर्नियर विमान आणि हेलिकॉप्टर प्रदान केले होते. भारतीय सैन्य तांत्रिक पथक या विमानाची देखभाल करत आहे. याच भारतीय सैनिकांनी 15 मार्चपर्यंत मालदीवमधून बाहेर पडावे असे मुइज्जू यांनी म्हटले आहे.