मालदीवला भारताच्या प्रभावाची जाणीव
नवी दिल्लीत पोहोचले मुइज्जू : बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार दौरा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू रविवारी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. मागील वर्षी मुइज्जू यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान ‘इंडिया आउट’चा नारा दिला होता, ज्यामुळे भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडले होते. सत्तेवर आल्यावर मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांना मालदीवमधून परत पाठविले होते. परंतु चीनसोबत घनिष्ठ संबंध राखणाऱ्या मुइज्जू यांना भारतीय पर्यटकांना मालदीवपासून पाठ फिरविल्यावर भारताच्या शक्तीची जाणीव झाली. आर्थिक स्थिती बिघडू लागल्याने मालदीवने भारतासोबत नव्याने संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे मुइज्जू हे भारतीय विमानातूनच नवी दिल्लीत पोहोचले आहेत.
मुइज्जु यांच्यासोबत मालदीवच्या प्रथम महिला साजिदा मोहम्मद देखील भारत दौऱ्यावर आल्या आहेत. मुइज्जू यांचा हा पहिलाच भारतासोबत द्विपक्षीय दौरा आहे. यादरम्यान मुइज्जू हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विदेशमंत्री एस. जयशंकर यांना भेटणार आहेत. केंद्रीय विदेश राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी मुइज्जू यांचे विमानतळावर स्वागत केले. राष्ट्रपती मुर्मू यांच्या अधिकृत निमंत्रणानुसार मुइज्जू हे 6-10 ऑक्टोबरपर्यंत भारताच्या दौऱ्यावर असतील. अलिकडेच न्यूयॉर्कमध्ये 79 व्या संयुक्त राष्ट्रसंघ महासभेदरम्यान मुइज्जू यांनी भारत दौऱ्याचे संकेत दिले होते. तसेच त्यांनी दोन्ही देशांदरम्यान मजबूत होणाऱ्या द्विपक्षीय संबंधांची प्रशंसाही केली होती.
मुइज्जू हे चालू वर्षात दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत. यापूर्वी जून महिन्यात मुइज्जू हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सामील झाले हेते. तर पूर्वीच्या परंपरेनुसार मालदीवचा अध्यक्ष हा स्वत:चा पहिला विदेश दौरा म्हणून भारताची निवड करत होता. परंतु मुइज्जू यांनी पदभार स्वीकारल्यावर प्रथम तुर्किये आणि मग चीनचा दौरा करत भारताला एकप्रकारे दुखावले होते.
संबंध सुधारणे हाच उद्देश
मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू यांच्या भारत दौऱ्याचा उद्देश मागील वर्षापासून तणावपूर्ण राहिलेले संबंध पूर्ववत करणे आहे. चीनकडे ओढा असलेल्या मुइज्जू यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. तेव्हापासून दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. मुइज्जू यांनी पदाची शपथ घेतल्याच्या ाकही तासातच स्वत:च्या देशामधून भारतीय सैनिकांना माघारी बोलाविण्यात यावे असे भारताला सुनावले होते. तर मुइज्जू यांनी चीन दौऱ्यादरम्यान पर्यटनासमवेत विविध क्षेत्रांकरता 20 करार केला होता. तर चालू वर्षाच्या प्रारंभी मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून आक्षेपार्ह विधाने केली होती. यामुळे संबंध आणखीच बिघडले होते. तर मंत्र्यांच्या विरोधात कारवाई करत मुइज्जू यांनी संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला होता.