मलेशिया सुपर 100 बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
सात्विकसाईराज-चिराग, लक्ष्य सेन, प्रणॉयकडून मोठ्या अपेक्षा
वृत्तसंस्था/ क्वालालंपूर
मोसमाचा प्रारंभ करणाऱ्या मलेशिया सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेची सुऊवात आज मंगळवारपासून होत असून भारताची दुहेरीतील जोडी सात्विकसाईराज रान्कीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे भरीव मजल मारण्याचे लक्ष्य बाळगतील, तर लक्ष्य सेन त्याच्या अलीकडच्या फॉर्मला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल आणि एच. एस. प्रणॉय या मोसमातील दीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करण्याची आशा बाळगेल.
सातव्या मानांकित सात्विक आणि चिरागसाठी ही 1.45 दशलक्ष डॉलर्स इनामांची स्पर्धा 2024 प्रमाणेच नवीन हंगामाची सुऊवात करणारी आहे. गेल्या वर्षी जरी ते विजेतेपदास थोडक्यात हुकले असले, तरी, या जोडीने आणखी तीन स्पर्धांची अंतिम फेरी गाठली आणि त्यापैकी दोन जिंकण्यात यश मिळविले. आशियाई क्रीडास्पर्धेतील ही सुवर्णपदक विजेती जोडी गेल्या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये राहिली आणि या वर्षी त्या यशाची पुनरावृत्ती करण्याची आशा ते बाळगून असतील.
मलेशियाचे किम टॅन हर हे पुन्हा त्यांचे प्रशिक्षक बनलेले असून जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकवर राहिलेल्या या जोडीची मोठी मजल मारण्याचा निर्धार निश्चित असेल, परंतु त्यांच्यासमोर खडतर आव्हानेही आहेत. ते चिनी तैपेईच्या मिंग चे लू आणि तांग काई वेई या जोडीविऊद्ध त्यांच्या मोहिमेची सुऊवात करतील. जर त्यांनी प्रगती केली, तर त्यांना उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या चौथ्या मानांकित फजर अल्फियान आणि मेहम्मद रियान अर्डियंटो यांचा सामना करावा लागेल.
पुऊष एकेरीत लक्ष्य सेन सैय्यद मोदी इंटरनॅशनल सुपर 300 मधून आपला विजेतेपदाचा दुष्काळ संपविल्यांतर आणि गेल्या महिन्यात झालेल्या किंग कप इंटरनॅशनलमध्ये तिसरे स्थान पटकावल्यानंतर अलीकडील यश पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, प्रणॉय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत बाहेर पडल्यानंतर पाच महिन्यांची विश्रांती घेऊन पुन्हा खेळात परतत आहे. या 32 वर्षीय खेळाडूला चिकुनगुनियामुळे ब्रेक घ्यावा लागला होता. त्याची पहिली कसोटी सुऊवातीच्या फेरीत कॅनडाच्या ब्रायन यांगविरुद्ध लागणार आहे, तर प्रियांशु राजावतला पहिल्या सामन्यात सातव्या मानांकित चीनच्या ली शी फेंगचा सामना करावा लागणार आहे.
महिला एकेरीत दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू नुकतेच लग्न झालेले असल्याने स्पर्धेत दिसणार नाही. तिच्या अनुपस्थितीत मालविका बन्सोड, आकार्षी कश्यप आणि अनुपमा उपाध्याय या इतर भारतीय खेळाडू आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करतील. महिला दुहेरीत सहावे मानांकन लाभलेली ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद तसेच आठवे मानांकन लाभलेली तनिषा क्रास्टो व अश्विनी पोनप्पा, ऋतुपर्णा आणि श्वेतपर्णा या पांडा भगिनी तर मिश्र दुहेरीत तनिषा क्रास्टो व ध्रुव कपिल, सतीश कऊणाकरन आणि आद्या वरियथ तसेच आशिथ सूर्या आणि अमृता प्रमुथेश या जोड्या झळकणार आहेत.