मलेशिया, नेदरलँड्सची विजयी सलामी
► वृत्तसंस्था /मदुराई
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्व चषक हॉकी स्पर्धेत शनिवारी झालेल्या विविध सामन्यांत मलेशिया आणि नेदरलँड्स यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करत विजयी सलामी दिली.
इ गटातील शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात मलेशियाने ऑस्ट्रीयाचा 5-1 अशा गोलफरकाने पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सने इंग्लंडचे आव्हान 5-3 असे संपुष्टात आणले.
पहिल्या सामन्यात मलेशियातर्फे दानिश खेरील याने 56 आणि 57 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. मलेशियातर्फे हॅरिस उस्मानने 28 व्या मिनिटाला, अॅडम जोहारीने 47 व्या आणि नवनीश पनीकरने 55 व्या मिनिटाला गोल नोंदविले. ऑस्ट्रीयातर्फे एकमेव गोल 56 व्या मिनिटाला ज्युलियन केसरने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला.
दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सने इंग्लंडला नमवित विजयी सलामी दिली. नेदरलँड्सतर्फे जेन लँडने दुसऱ्या आणि 49 व्या मिनिटाला असे दोन मैदानी गोल नोंदविले. 26 व्या मिनिटाला कास्पर व्हॅन डेर व्हेनने मैदानी गोल केला. जॉपी वूलबर्टने 39 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर नेदरलँड्सचा चौथा गोल केला. 54 व्या मिनिटाला डॅनिलो ट्रेलिंगने पेनल्टी कॉर्नरवर नेदरलँड्सचा पाचवा गोल नोंदविला. इंग्लंडतर्फे कॅडेन ड्रेसेने 11 व्या मिनिटाला, मिचेल रॉयडेनने 29 व्या मिनिटाला तर जॉर्ज फ्लेचर 49 व्या मिनिटाला गोल केले.
सामन्यांचे निकाल
मलेशिया वि.वि. ऑस्ट्रीया
5 1
नेदरलँड्स वि.वि. इंग्लंड
5 3