मला पोलिसांनी नजर कैदेत ठेवलेः राजू शेट्टींचा आरोप
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर नजर कैदेत
कोल्हापूर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर मला पोलिसांनी नजर कैदेत ठेवलं, आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप केले आहेत. मात्र स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमि काव्याने आंदोलन यशस्वी करतील असेही शेट्टी म्हणाले. रत्नागिरी नागपूर महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही, मात्र मोबदला दिला पाहिजे. सरकार दडपशाही करत आहे मात्र आमचा लढा सुरूच राहणार, असे यावेळी शेट्टी म्हणाले.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, आज सकाळी ८ वाजता पोलिस माझ्या घरी आले आणि म्हणाले, की तुम्हाला घरातून बाहेर पडता येणार नाही. आंदोलन स्थळी जाता येणार नाही. तरी तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊ. आम्ही इथेच बसून राहू. तुम्हाला नजर कैदेत ठेवलेलं आहे. आंदोलन करू देणार नसाल तर मला इतर कामं करु द्या. तरी आंदोलन ठरलेल्या तारखेला होणारच आहे. सरकारने कितीही दडपशाही केली तरी आंदोलन हे ठरलेल्या तारखेला होणारच. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गनिमी कावा शिकवलेला आहे. त्या गनिमी काव्यानेच आंदोलन करू. आजच नव्हे, तर इथून पुढे कसलीही सूचना न देता आम्ही सातत्याने आंदोलनं करु. या महायुती सरकारच्या एका लाडक्या आमदाराला वाचविण्यासाठी, आमदाराची जमिन आणि त्याचे कॉलेज वाचविण्यासाठी ले- आऊट बदलेला आहे. आधीचा ले आऊट बदलून दुसरा टाकला. जो सरकारी जमीनी गायरान, फॉरेस्ट विभागाची जमीन निमशिरगांव, जैनापूर, दानोळी येथील गायरान जमिनीतून जात होता, त्यामध्ये या लाडक्या आमदाराचे कॉलेज आणि जमिन येत होती. भूमिअधिग्रहण कायदा दुरुस्ती झाल्यानंतर मिळणारा मोबदला ९० लाखांचा असून अशा तुटपुंजा मोबदल्यासाठी लाडक्या आमदाराचा तोटा होऊ नये. म्हणून तिसरा ले आऊट हा उत्तर भागातून टाकला. जिथे महापूराचे पाणी जास्तदिवस रेंगाळते. अशाच ठिकाणी जास्त प्रमाणात भरावा टाकून महामार्गाचे काम होणार आहे. भरावा टाकल्यानंतर एक लाडका आमदार वाचविण्यासाठी अख्खी सांगली पाण्याखाली जाणार आहे. मौजे डिग्रज,कसबे डिग्रज, समडोळी, कवठे पिरान, दुधगाव, खोची अशी अनेक गावांना पुराचा प्रचंड मोठा फटका बसणार आहे. पुलाचे स्ट्रक्चर आधी दाखवा. जुलै महिन्यात येणारे पुराचे पाणी योग्य पद्धतीने परतले नाही तर त्याचा फटका आम्हाला बसतो. शिवाय शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किंमतीने जात आहे. शेतकऱ्यांनी रस्त्याला विरोध केला नाही आहे, पण त्याचा योग्य मोबदला मिळण्यासाठी हे आंदोलन आहे. पण शेतकऱ्यांच्या मागण्या न ऐकता, पुरवता सरकार जर दडपशाही करणार असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.