वडगाव तलाव जनावरांसाठी उपलब्ध करा
शेती सुधारणा युवक मंडळाची मागणी
बेळगाव : मंगाईनगर, वडगाव येथे जनावरांसाठी असलेल्या तलावाच्या सभोवती लोखंडी जाळी लावण्यात आल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील तलावात जाण्यासाठी दहा फुटांचा रस्ता उपलब्ध करावा, अशी मागणी विष्णू गल्ली, वडगाव येथील शेती सुधारणा युवक मंडळाने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. मंगाईनगर परिसरात शेतकऱ्यांनी तलावाची निर्मिती केली आहे. शिवाय या तलावाचा कर देखील शेतकऱ्यांकडून भरला जातो. असे असले तरी सद्यस्थितीत मनपाकडून या तलावाभोवती लोखंडी तार लावण्यात आली आहे. त्यामुळे जनावरांना तलावात पाणी पिणे आणि धुण्यासाठीही अडचण होऊ लागली आहे. वडगाव परिसरात हजारो जनावरांची संख्या आहे. मात्र, या जनावरांना पाणी मिळत नसल्याने प्रश्न गंभीर बनू लागला आहे. तातडीने तलावात जनावरांना उतरण्यासाठी दहा फुटांचा रस्ता तयार करावा, अशी मागणीही परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.