सत्ताधारी पॅनेलला विजयी करा
माजी आमदार अरविंद पाटील यांचे आवाहन
खानापूर : खानापूर अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक 12 जानेवारी रोजी होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी अखेरपर्यंत प्रयत्न केला. तसेच अमृत शेलार व बाळाराम शेलार यांच्यात समझोता घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला. या प्रयत्नाला अमृत शेलार यांनी सहकार्य केले. मात्र बाळाराम शेलार यांनी प्रतिसाद न दिल्याने अखेर निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला. सत्तारुढ सहकार पॅनेलच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात बँकेने चांगली प्रगती केली. तसेच बँकेतून अत्यावश्यक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्याचा प्रयत्न सुरू असून येत्या काही दिवसात तांत्रिक बाबतीत बँक परिपूर्ण होणार आहे. यात शंका नाही. बँकेला शंभर वर्षांचा इतिहास असून बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. तालुक्यातील सावकारशाहीला पायबंद घालण्याचे काम बँकेकडून झाले आहे.
मात्र अलीकडे सरकारी आणि निबंधक कार्यालयाकडून जाचक अटी आणि नियम लादण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जवाटप करताना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी अभ्यास न करता बँकेकडून कर्जे देत नसल्याचा कांगावा करत आहेत. मी स्वत: गेली 20 वर्षे जिल्हा सहकारी बँकेत संचालक म्हणून काम पहात आहे. त्यामुळे सहकार खात्यातील बँक नियमावलीतील मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे बँकेकडून कुणाचीही कर्जासाठी आडवणूक होत नाही. नोकर भरतीही सरकारच्या व रजिस्ट्रार ऑफिसच्या नियमानुसारच झालेली आहे. बँकेत नोकर भरती करताना हलकर्णी, रामगुरवाडी, कुप्पटगिरी, होनकल, हलगा, कांजळे, इदलहोंड, माळअंकले, खानापूर शहर, नावगा या गावातील उमेदवारांना नोकरीत घेण्यात आले आहे. असे असताना विरोधी गटाकडून अपप्रचार करण्यात येत आहे. मी बँकेच्या भविष्याचा विचार करून सत्तारुढ गटाला बँकेच्या सभासद मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन करत आहे.