कौलापूरवाडा पोल्ट्रीबाबत त्वरित योग्य निर्णय घ्या!
अन्यथा गवळी समाजाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
खानापूर : कौलापूरवाडा येथील पोल्ट्रीबाबत शासनाकडून तसेच स्थानिक अधिकाऱ्यांकडून योग्य कारवाई करण्यात येत नसल्याने येथील नागरिकांनी बैठक घेऊन राज्यातील सर्व धनगर-गवळी समाजाचे उग्र आंदोलन छेडण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती धनगर-गवळी समाजाचे नेते भैरू वाघू पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. कौलापूरवाडा येथे अनधिकृतपणे काहीवर्षापासून मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय सुरू आहे. यामुळे या ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार पोल्ट्रीबाबत अर्जविनंत्या करूनदेखील न्याय मिळाला नाही. कौलापूरवाडा येथे धनगर-गवळी समाज रहात आहे. त्यामुळे या समाजावर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात येत असून याबाबत राज्य धनगर गवळी समाज समिती आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. पोल्ट्रीबाबत 15 दिवसात योग्य कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती भैरु पाटील यांनी दिली. बैठकीला राज्य उपाध्यक्ष अप्पू शिंदे, जिल्हायक्ष बमू पाटीलसह तालुका-जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.