नाझर कॅम्प येथील तलाव विसर्जनासाठी उपलब्ध करा
मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. यासाठी प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी घेण्याकरिता एक खिडकीची सोय करावी. याबरोबरच दरवर्षी परवानगीसाठी करावी लागणारी पळापळ दूर करण्यासाठी पाच वर्षासाठी एकदाच परवानगी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ शहापूर विभागतर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलीस, महानगरपालिका, हेस्कॉम आदी परवान्यांसाठी संबंधित विभागाकडे धावाधाव करावी लागत आहे. ही प्रक्रिया प्रत्येक वर्षी करावी लागते. यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होते. यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक वर्षी परवाना देण्यापेक्षा पाच वर्षांकरिता एकाचवेळी परवाना देण्यात यावा. सध्याच्या घडीला एक खिडकीची सोय करून मंडळांना सहकार्य करावे. तसेच नाझर कॅम्प येथील विसर्जन तलाव शेजारी असणारी सार्वजनिक विहीर कोसळली आहे. धोका लक्षात घेत मनपाकडून त्याठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे अडचण निर्माण होत आहे.
गणेश विसर्जनासाठी जादा क्रेनची सोय करा
या भागातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी जुने बेळगाव जक्कीनहोंडा, शिवाजी गार्डन येथे घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला विलंब होत आहे. यासाठी या भागात येणाऱ्या भारतनगर, वडगाव, शहापूर भागातील मंडळांच्या सोयीसाठी नाझरकॅम्प येथे उभारण्यात आलेला विसर्जन तलाव पूर्वीप्रमाणे उपलब्ध करून द्यावा. त्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. व इतर ठिकाणी गणेश विसर्जनासाठी होणारी गर्दी कमी होईल. तसेच जुने बेळगाव गणेश विसर्जनासाठी जादा क्रेनची सोय करून देण्यात यावी. शहरातील रस्त्यांवरील ख•s बुजविण्यात यावेत. पथदीप, मिरवणूक मार्गावरील अडथळे, दूर करण्यात यावेत, विसर्जन तलावांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोंटक्की, उपाध्यक्ष अशोक चिंडक, सेक्रेटरी राजू सुतार, राव बहाद्दूर कदम, राजू पाटील आदी उपस्थित होते.