पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा वापर होणार नसल्याची दक्षता घ्या
पोलिस महासंचालकांचे आयोजकांना आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
नवीन वर्षाच्या पार्ट्यांसाठी गोव्यात अंमलीपदार्थांचा पुरवठा करण्याची योजना दिल्ली पोलिसांनी हाणून पाडल्याच्या एका दिवसानंतर, गोवा पोलिसांनी राज्यात रविवारी पार्टी आयोजांकडे संपर्क साधून त्यांना खबरदारी घेण्यास बजावले आहे. राज्यातील नियोजित रेव्ह पार्ट्यांची माहिती आणि इतर पार्ट्यांवर नजर ठेवण्याबाबत पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत, असे पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी सांगितले.
नाताळ आणि नवीन वर्षाच्या दरम्यान, लाखो आंतरराष्ट्रीय आणि देशी पर्यटक गोव्यात येतात. राज्यात नवीन वर्षात अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. सोशल मीडियावर या पार्ट्यांची जाहिरात केली जाते. त्यामुळे आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक गोव्यात येत असतात, मात्र पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असेही अलोक कुमार म्हणाले.