For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संकल्प नववर्षाचा नव्हे तर संपूर्ण आयुष्याचा करा!

06:36 AM Dec 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
संकल्प नववर्षाचा नव्हे तर संपूर्ण आयुष्याचा करा
Advertisement

आयुष्य एक वर्षाचे नसते, ते सातत्याने सुरू असते, म्हणून संकल्प हा आयुष्याचा करा. केवळ एक वर्षाचा नव्हे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आत्मपरीक्षण करा. झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी पुढील वर्षी घ्या.

Advertisement

डिसेंबर संपत आला की वेध लागतात ते नववर्षाचे! रंगी बेरंगी चैतन्याचे सळसळणारे स्वप्नाळू नवे दिवस असतात ते. प्रत्येकजण काही ना काही तरी स्वप्न पाहात असतो. नवीन वर्ष, नवी उमेद, नवी आशा, अन आकांक्षा!! या दिवसात प्रत्येक जण स्वत:शी काही ना काही तरी निश्चय-संकल्प करत असतो. पुढे त्या संकल्पाचा कितीसा पाठपुरावा होतो? तो पार पाडण्यासाठी चिकाटी, जिद्द व मेहनत कितीजण दाखवतात हा भाग वेगळाच. तसे पाहायला गेले तर ‘संकल्प’ हे आपण स्वत:ला दिलेले वचन असते. ‘आपण स्वत:ला दिलेले वचन पाळत शकत नसू, तर दुसऱ्याला दिलेले कसे पाळणार?’

नवीन वर्ष 2025 सुरू होणार आणि जुने वर्ष संपणार. अर्थातच बहुतेक मंडळी संकल्प ठेवणार (नेहमीप्रमाणे) वर्ष जरी नवीन असले तरी आपण त्यापलीकडे जाऊन मूळ प्रश्न स्वत:ला विचारणे आवश्यक आहे. आपल्या जीवनदृष्टीचे काय?  तुम्ही स्पष्ट बघू शकता की तुम्ही कोणत्या दिशेने चालला आहात? आपण आपल्या दैनंदिन आयुष्यातील सांसारिक क्रियांमध्ये इतके अडकतो की कोणत्या मार्गाने चाललो आहोत हे आपल्याला दिसत नाही. आपण अंध होऊन जातो. आपण कुठे जात आहोत हे माहीत नसल्यास आयुष्याचा प्रवास करण्याचा अर्थ फारसा उरत नाही. म्हणूनच ते दैनंदिन जीवनात रिफ्लेक्ट (प्रतिबिंबित) होण्याची गरज असते. थोडे थांबून त्रयस्थ म्हणून स्वत:ला प्रश्न विचारायला पाहिजे. या वर्षी वेगळ्या प्रकारे काम करण्याची आवश्यकता आहे का, असे अनेक प्रश्न आपण स्वत:ला विचारायला पाहिजेत. ज्या व्यक्तीला परिवर्तनाची इच्छा असते तिने वरील प्रश्नाबद्दल जागरूक असणे आवश्यक ठरते तरच गाडी रुळावर यायला सुरुवात होऊ शकेल.

Advertisement

बरेचदा आपण केलेले संकल्प अनेक प्रलोभनामुळे व इच्छाशक्तीच्या अभावामुळे मोडले जातात. क्वचितच त्यातले काही पूर्ण करतो. म्हणून प्रथम संकल्प नेहमी वास्तविक असायला पाहिजेत, जेणेकरून ते आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद ठेवतात. संकल्प हे आपण स्वत:ला दिलेले वचन असते. आपण स्वत:ला दिलेले वचन पाळत शकत नसू, तर दुसऱ्याला दिलेले कसे पाळणार? वचन पाळण्याची सवय कशी लागणार? जेव्हा आपण वचनास जागतो तेव्हा तीन फायदे होतात:-

1.आपण सिद्ध करतो की आपणात बदलण्याची शक्ती आहे.

2.आपण स्वत:वर अवलंबून राहू शकतो आणि

3.ठरविल्यास स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.

आपण बरेचदा संभ्रमात असतो, की आपण विचारांनी तयार झालो आहोत की आपण आपले विचार तयार करतो? याचे उत्तर दोन्ही आहे, रोज आपल्या विचारामुळे भावना, वर्तन आणि परिणाम आपोआप उद्भवतात जर आपल्याला विचारांची जाणीव राहिली आणि त्याप्रती आपण सजग, संवेदनशील राहिलो, तर आपण त्यांची दिशा बदलू शकतो. असे झाल्यास भावना, वर्तन आणि परिणाम बदलण्यास मदत होत असते, आपल्या विचारावर आपले जेवढे नियंत्रण असते, त्याप्रमाणात आपल्याला यश मिळते. आपणास स्वयंचलित यंत्र व्हायचे नसेल आणि पहिला संकल्प सिद्धीस न्यावयाचा नसेल तर दुसरा संकल्प करणे महत्त्वाचे ठरते. तो संकल्प म्हणजे आपल्या विचारांची जागरूकता वाढविणे. आपल्यात सकारात्मक तसेच नकारात्मक विचार येत असतात, एक आपल्याला प्रेरणा, प्रोत्साहन, शक्ती देतात, मुक्त करतात, तर दुसरे गुलाम, अशक्त करतात. आपले मन, शरीर, आत्मा एकत्रित असल्यामुळे एका भागात जे घडते त्याचा परिणाम दुसऱ्या भागातही होऊ शकतो आणि म्हणून संकल्प करताना तो खात्रीलायक असायला पाहिजे.

जेव्हा आपण आपल्या संकल्पाला चिकटून असतो, तेव्हा आपण अधिक मजबूत होतो, आपला आत्मविश्वास वाढतो, संकल्प शब्द व त्यामागचा अर्थ महत्त्वाचा असतो. जीवनाचा हेतू साध्य करायचा असल्यास अर्थरूपी संकल्प हवा. तो लघुदृष्टीचा नसावा, उदा: ‘यापुढील वर्षी मी (मला असलेले) व्यसन करणार नाही.’ यापेक्षा ‘मी माझ्या निरोगी जीवनासाठी व्यसन करणार नाही,’ हे अधिक अर्थपूर्ण आहे.

जीवनात ध्येय, हेतू महत्त्वाचे असतात. ते प्राप्त करण्यासाठी सावधगिरी बाळगा. संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न करा, अतिरेक टाळा, जागरूक राहा. आपले अस्तित्व किंवा हेतूंचे कारण काय आहे हे बघण्याची दृष्टी निर्माण करा, दुसऱ्याचे कौतुक करायला शिका. कृतज्ञता व्यक्त करायला शिका, कृती करण्यापूर्वी विचार करा, निसर्ग, कला, संगीत, साहित्य, कविता, शिल्पकला इत्यादींपासून आनंद घ्यायला विसरू नका.

आयुष्य एक वर्षाचे नसते, ते सातत्याने सुरू असते, म्हणून संकल्प हा आयुष्याचा करा. केवळ एक वर्षाचा नव्हे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आत्मपरीक्षण करा. झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी पुढील वर्षी घ्या. परंतु हे करताना कोणताही ताण घेऊ नका. सहजतेने जीवन जगा. संघर्ष टाळा. उत्सव ज्या मानसिकतेने साजरा करता त्याच मानसिकतेने आयुष्यही संकल्पच्या माध्यमातून जगा, यश जास्त मिळेल.

आपणास नवीन वर्षासाठी शुभेच्छा !

-डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी

Advertisement
Tags :

.