शेतीसाठी आवश्यक खते उपलब्ध करा, वीजपुरवठा सुरळीत करा
खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने तहसीलदार, हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने तहसीलदार दुंडाप्पा कोम्मार यांना शेतीसाठी आवश्यक असणारे खते उपलब्ध करून देण्यात यावीत, तसेच हेस्कॉमचे प्रवीण बरगले यांना तालुक्यात चाललेला विजेचा खेळखंडाबा तातडीने थांबवावा, आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन म. ए. समितीच्यावतीने देण्यात आले. तालुक्यात खरीपाच्या हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू आहे. मात्र शेतकऱ्यांना आवश्यक असणारा खतपुरवठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना पेरणी करणे कष्टप्रद बनले आहे. तसेच जर खताची उपलब्धता झाली नसल्यास पेरणीचे वेळापत्रक कोलमडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
यासाठी शासनाने तातडीने सर्वप्रकारची खते उपलब्ध करून देण्यात यावीत, अशा मागणीचे निवेदन म. ए. समितीच्यावतीने तहसीलदार दुंडाप्पा कोम्मार यांची भेट घेऊन खत उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी तहसीलदारांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण याबाबत योग्य उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी निवेदन देताना माजी आमदार दिगंबर पाटील, अध्यक्ष गोपाळ देसाई, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, अमृत शेलार, प्रकाश चव्हाण, धनंजय पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, रमेश धबाले, रणजीत पाटील, राजाराम देसाई, नागेश भोसले यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात
तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून विस्कळीत वीजपुरवठा होत आहे. शहरासह ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी रात्रीच्या वेळीच वीजपुरवठा होत असल्यामुळे जंगल परिसरातील शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे. तसेच खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर परिणाम होत आहे. यासाठी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालून तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन हेस्कॉमचे कार्यकारी अभियंते प्रवीण बरगले यांना देण्यात आले.