मार्च 2027 पूर्वी कुष्ठरोगमुक्त करा
कोल्हापूर :
कोल्हापूर जिह्यातील प्रत्येक गावात कुष्ठरोग निर्मूलन करण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविकापासून तालुका आरोग्य अधिकारी यांच्यापर्यंत प्रत्येकाने प्रत्यक्ष सहभाग नोंदवून मार्च 2027 पूर्वी जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी मोहीम हाती घ्या असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत 30 जानेवारी पासून स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत 26 जानेवारी रोजी आणि 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कुष्ठरोगाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभागाच्या डॉ. हेमलता पालेकर यांनी कामाचे सादरीकरण केले.
प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कुष्ठरोगमुक्त कोल्हापूर करण्यासाठी तसेच कुष्ठरुग्णांशी भेदभाव करणार नाही, अशा आशयाचे आवाहन वाचन करण्यात येणार आहे. सरपंचांचे भाषण, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोगमुक्त भारतासाठी प्रयत्न करण्याबाबतची प्रतिज्ञा उपस्थित नागरीकांना देण्यात येणार आहे, सपना या कुष्ठरोगाच्या जनजागृतीसाठी तयार केलेल्या आयडॉलने समाजाला द्यावयाच्या संदेशाचे वाचन करण्यात येणार आहे.
या कालावधीत कुष्ठरोगाची शास्त्राrय माहितीचा समाजामध्ये प्रचार व प्रसार करुन लवकर निदान व लवकर उपचार यांचे महत्व अधोरेखीत करण्यात येणार आहे.
- क्यूआर कोडमधून जनजागृती व प्रश्नोत्तरे
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिक व बाधित तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्यासाठी कुष्टरोग निर्मूलनबाबत माहिती देण्यासाठी क्यूआरकोड तसेच गूगल लिंकद्वारे प्रश्नावली तयार करून जनजागृती करण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर प्रत्येक गावात दवंडी द्या, संबंधित विभाग प्रमुखांना कामांचे वाटप करून द्या, सर्वेक्षणाची गती वाढवा, कुष्ठरोगमुक्त गावे जाहीर करा अशा सूचना त्यांनी जिल्हा कुष्ठरोग निर्मूलन होण्यासाठी दिल्या.