खानापूर-हेम्माडगा रस्ता वाहतुकीस सुरळीत करा
अन्यथा 20 रोजी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा : खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण : तरीही संबंधितांचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
खानापूर : खानापूर-हेम्माडगा रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास करणे जोखमीचे बनले आहे. वारंवार विनंती करूनदेखील या रस्त्याच्या डागडुजीबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने साफ दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर छोट्यामोठ्या अपघाताच्या मालिका सुरू आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर होऊन देखील हे काम हाती घेण्यात आले नसल्याने या भागातील नागरिकांनी 20 सप्टेंबर रोजी खानापूर येथे उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. खानापूर-हेम्माडगा हा रस्ता अनमोडमार्गे गेव्याला जाण्यासाठी अत्यंत जवळचा रस्ता म्हणून ओळखला जातो. हा रस्ता राज्य शासनाने हेम्माडगा-सिंधनूर राज्यमार्ग म्हणून घोषित केला आहे.
मात्र गेल्या काही वर्षापासून या रस्त्याची देखभाल अथवा दुरुस्ती करण्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने साफ दुर्लक्ष केले आहे. राज्य मार्गाचा दर्जा मिळवून देखील या रस्त्याची रुंदी फक्त 3.5 मीटर असल्याने या रस्त्यावरुन वाहतूक करताना अडथळे निर्माण होत आहेत. मुळात हा रस्ता जंगल विभागातून जात असल्याने वेडीवाकडी वळणे आणि जंगल असल्याने या रस्त्यावरुन वाहतूक करताना जोखमीचे आहे. त्यातच या रस्त्याची देखभाल करण्यात न आल्याने हा रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे. मागीलवर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला होता. त्या निधीतून फक्त तीन कि. मी. रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र खानापूर तालुक्याच्या हद्दीपर्यंत चाळण झाली असून खानापूरच्या वेशीतूनच हा रस्ता उद्ध्वस्त झाला आहे.
या रस्त्यावरुन वाहतूक करताना खड्ड्यांमुळे धोकादायक आणि अरुंद असलेल्या रस्त्यामुळे वारंवार अपघाताची मालिका सुरू आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 53 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. यातून 1 कि. मी. रस्ता दुरुस्त करण्यात येणार आहे. मात्र त्याचेही काम अद्याप हाती घेण्यात आलले नाही. या निधीतून शेडेगाळी क्रॉसपासून हारुरी क्रॉसपर्यंत रस्ता दुरुस्त करण्यात येणार आहे. मात्र हे काम हाती घेण्यात आले नसल्याने याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या भागातील नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अनेकवेळा अर्जविनंत्या करूनदेखील या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. त्यामुळे त्या भागातील चाळीस खेड्यांच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासाठी गणपती उत्सवानंतर दि. 20 सप्टेंबर रोजी खानापूर येथे रास्तारोको करून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आमदारांनी या रस्त्याबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज
खानापूर ते हेम्माडगा या रस्त्याच्या डागडुजीसाठी या भागातील नागरिकांनी वेळोवेळी विनंत्या, अर्ज, आंदोलने केली. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते आणि लोकप्रतिनिधीनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे. या भागातील जनता रोज रस्त्यामुळे मरणयातना भोगत आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी स्थलांतरासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र तालुक्यातील समस्यांबाबत गेल्या वर्षभरात त्यांच्याकडून काहीही पाठपुरावा झालेला नाही. या भागातील नागरिकांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांना प्रचंड मताधिक्य देऊन देखील आमदारांनी या भागातील समस्या सोडविण्यासाठी ठोस भूमिका घेतलेली नाही. जर 20 सप्टेंबरपर्यंत या रस्त्याबाबत योग्य निर्णय न झाल्यास खानापुरात रास्तारोको करून धरणे आंदोलन हाती घेण्यात येईल.
-कृष्णा गुरव, ग्रा. पं. सदस्य शिरोली