लाभदायक शेतीसाठी केंद्राच्या योजनांचा सदुपयोग करा
केंद्रीय मंत्री सीतारामन यांचे शेतकऱ्यांना आवाहन
बेंगळूर : शेतीला लाभदायक व्यवसाय बनविण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुक्ष्म आहार प्रक्रिया उद्योग औपचारिकरण (PMFME) आणि प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना (PMDDKY) यांचा शेतकऱ्यांनी सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. बुधवारी कोप्पळमधील शेतकरी प्रशिक्षण आणि सामान्य सुविधा केंद्रांचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. जीएसटी सुधारणा शेतकऱ्यांसाठीही लाभदायक आहे. खासदारांच्या स्थानिक प्रदेश विकास निधीचा (MPLAD) वापर करून शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व सामान्य सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. केंद्र सरकार आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य देत आहे, असे त्यांनी सांगितले.
‘पीएमडीडीकेवाय’साठी अर्थसंकल्पात 24,000 कोटी रु.
खेड्यांमध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी ग्रामीण उद्यमशिलतेला प्रोत्साहन देण्याचे ध्येय सरकारसमोर आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात पीएमडीडीकेवाय योजनेसाठी 2025-26 या वर्षात 24,000 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. कृषी उत्पादकता वाढविणे, पीक विविधतेला प्रोत्साहन देणे आणि कमी कार्यक्षमतेच्या 100 जिल्ह्यांमध्ये उपजीविका सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.