For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माहिती तंत्रज्ञानात गोव्याला अग्रेसर बनवू

12:51 PM Jul 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
माहिती तंत्रज्ञानात गोव्याला अग्रेसर बनवू
Advertisement

माहिती तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांची घोषणा : सांखळी, पर्वरी, डिचोलीत ‘हर घर फायबर’

Advertisement

पणजी : गोवा हे जरी पर्यटकांचे पसंतीचे स्थळ असले, तरी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्याला अग्रेसर करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. लवकरच संपूर्ण गोवा, ‘हर घर फायबर’ योजनेखाली जोडण्यात येणार असून त्याची सुरूवात म्हणून सांखळी, पर्वरी व डिचोली येथे पायलट प्रकल्प सुरू करण्यात येईल. तसेच, राज्यात 4 नागरी सेवा केंद्रांची (सीएससी) स्थापना लवकरच करण्यात येईल, अशी घोषणा आयटी मंत्री रोहन खंवटे यांनी काल मंगळवारी विधानसभेत केली. पर्यटन, आयटी, मुद्रणालय आदी खात्यांवरील अर्थसंकल्पीय मागण्यांवेळी आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना मंत्री खंवटे यांनी ही घोषणा केली. मंत्री खंवटे म्हणाले, पर्यटनानंतर आता आयटी क्षेत्रात भारताची राजधानी म्हणून गोव्याचे नाव व्हावे, यासाठी आणि डिजिटल नॉमेडचे केंद्र व्हावे, यासाठी युद्धपातळीवर नवसंकल्पना आणि योजना माहिती तंत्रज्ञान खात्यातर्फे राबविण्यात येत आहेत.

माहिती तंत्रज्ञान खात्याने विविध 41 सरकारी विभागांच्या 247 सेवा ऑनलाईन केल्या आहेत. 8 लाख नागरिकांनी या सेवांचा लाभ घेतला असून सुमारे 31 लाख व्यवहार नोंद झाली आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप धोरण जाहीर झाल्यानंतर आजमितीस 759 स्टार्टअप्सची राज्यात नोंदणी झाली आहे. त्यांना वेगवेगळ्या योजनांखाली सुमारे 4 कोटींहून अधिक अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती खंवटे यांनी सभागृहात दिली. जीबीबीएनचे जाळे 414 ठिकाणी विस्तारित करण्यात आले आहे. कनेक्टिविटी सुधारणेचा हा भाग असून सरकारी खाती, महामंडळे, स्वायत्त संस्था आणि शैक्षणिक संस्थांसह 1500हून अधिक कार्यालये त्याखाली जोडण्यात आली असल्याची माहिती मंत्री खंवटे यांनी दिली.

Advertisement

भारत नेट-3 मुळे बळकटी

केंद्र सरकारने भारत नेट-3 योजना सुरू केल्यानंतर या योजनेला मिळालेली बळकटी सरकारसाठी फायदेशीर ठरली. त्यातून हर घर फायबर योजनेचा हेतू साध्य करण्यासाठी 50 कोटींची मदत केंद्राकडून राज्याला मिळाल्याचे सांगताना, उपरोल्लेखित 3 ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ‘हर घर फायबर’ योजना अंमलात आणणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.

पेपर विरहीत कामकाजासाठी प्रशिक्षण

पेपर विरहीत कामकाजासाठी 16 सरकारी खात्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुमारे सव्वा तीस कोटी ऊपये खर्चून सार्वजनिक दस्तावेजांच्या डिजिटायझेशनसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगताना ही मदत 50 वर्षांच्या व्याजरहीत तत्त्वावर केंद्राकडून मिळाल्याचे खंवटे यांनी सभागृहात स्पष्ट केले.  भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष अनुदान या केंद्राच्या योजनेखाली 2022-23 साठी ही मदत मिळाल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. वन मॅप गोवा जीआयएस योजनेखाली 32 खात्यांच्या 273 सेवा आणल्या गेल्या आहेत. सरकारी माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी याकरीता एआय चॅटबॉट सेवा सरकार लागू करणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले. जीईएल कंपनीची त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

 759 गोमंतकीय स्टार्टअप्स

गोवा स्टार्ट अप धोरणाखाली 759 गोमंतकीय स्टार्टअपची नोंदणी झाल्याचे खंवटे यांनी अधोरेखित केले. सीड फंडीग खाली 28 नवोन्मेषांना प्रत्येकी दहा लाख पर्यंतचे अनुदान वितरित केल्याचे ते पुढे म्हणाले. तुये येथील इलेक्ट्रॉनिक सिटीत अनेक नवे उद्योग अपेक्षित असून राज्याला मोठी गुंतवणूक त्याद्वारे मिळेल असे खंवटे यांनी सांगितले. व्हाय फाय स्पॉट्स उपक्रमाखाली राज्यातील 40 मतदारसंघात मिळून 175 स्पॉट सुरू करण्याचा विचार होता. त्याची घोषणा केल्यानंतर आजमितीस 137 व्हाय फाय स्पॉट सक्रिय आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कनेक्टीव्हीटीत सुधारणा झाल्याचे खंवटे यांनी सांगितले. शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वितरित करण्यात येत आहेत. अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसह इतर मागासवर्गीय व सर्वसामान्य वर्गवारीतील विद्यार्थ्यांनाही ही योजना विस्तारित करण्याचा सरकारचा विचार असल्याचे खंवटे यांनी सभागृहात स्पष्ट केले.

ग्रामीण कनेक्टिव्हीटीत प्रगती

हर घर फायबरमुळे गोव्यातील पेडणेपासून काणकोणपर्यंत ग्रामीण भागातील कनेक्टिव्हीटीत मोठी प्रगती झालेली आहे.डिचोली 1, सत्तरी 10, धारबांदोडा 1, फोंडा 3, केपे 4, सांगे 3 या ठिकाणी 4 जी टॉवर उभारून ग्रामीण भागाला नेटवर्किंगसाठी प्रयत्न केलेले आहेत. ज्या 60 जागा शोधल्या आहेत, त्यापैकी 24 टॉवर्स सत्तरी, सांगे व डिचोलीत उभारण्यात आल्याची माहिती खंवटे यांनी सभागृहात दिली.

Advertisement
Tags :

.