जिल्ह्यासाठी वितरण झालेल्या अनुदानाचा पूर्ण वापर करा
जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांची विकास आढावा बैठकीत सूचना : ग्राहक-शेतकरी यांची सभा घेऊन मार्गदर्शन करावे
बेळगाव : जिल्ह्यासाठी वितरण झालेल्या अनुदानाचा पूर्णपणे वापर करून प्रगती साधावी. उत्पादन वाढविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात यावी. मका, सोयाबीन, हळद, मध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात यावे, अशा काही सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. शुक्रवार दि. 10 रोजी जि. पं. च्या सभागृहात विविध खात्यांच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली.
यामध्ये अध्यक्षस्थानावरून शिंदे बोलत होते. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये रस्त्याच्या बाजूला बैठे विक्रेते व्यापार करीत असतात. या विक्रेत्यांना बाजारपेठ उभारून व्यापाराला संधी द्यावी. यासाठी कृती योजना तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. भुतरामहट्टी येथील अॅक्वेरियमसाठी प्रवेशद्वार तसेच प्रवेश शुल्क त्याचबरोबर केएफडीसी कॅन्टीन उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी पाहणी करण्यात यावी, अशी सूचना मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांना केली. रेशीम शेतीला गती देण्यासाठी रेशीम विकास योजनेसंबंधी माहिती देऊन या क्षेत्रातही शेतकऱ्यांनी प्रगती करावी, यासाठी रेशीम खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्यामध्ये रेशीम शेतीसंबंधी पाच प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपक्रम
पशुसंगोपन-पशुवैद्यकीय सेवा खात्यातर्फे जनावरांच्या आरोग्याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती पशुसंगोपन खात्याच्या उपसंचालकांनी दिली. पशुसंजीवनी चिकित्सा विभागामार्फत शेतकऱ्यांच्या घरी जाऊन जनावरांवर चिकित्सा करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये 17 पशु संजीवनी विभाग (वाहन) सुरू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून जनावरांवर उपचार तातडीने मिळू शकतील, असे सांगितले.
मत्स्योद्योगासाठी आवश्यक असणारे कीट वितरणासाठी अर्ज मागविण्यात आले होते. याला प्रतिसाद मिळाला असून अर्जदाखल झाले असल्याचे मत्स्योद्योग खात्याच्या उपसंचालकांनी सांगितले. जि. पं. उपसचिव (विकास) बसवराज अडवीमठ, मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर, कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड, पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक राजू कुलेर यासह मत्स्योद्योग, रेशीम, कृषी, कृषी बाजारपेठ खात्याचे अधिकारी, लीड बँक व नाबार्डचे प्रतिनिधी, जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
झेंकार ‘हनी ब्रँड’ची सुरुवात
मध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारमार्फत झेंकार या ‘हनी ब्रँड’ ची सुरुवात करण्यात आली असून याचा जिल्ह्यात व्यापकपणे प्रचार करण्यात यावा, अशी सूचनाही जि. पं. कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली.