शेतकर्यांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्या
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : कृषी खात्याच्या सभागृहात बैठक
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात उशिरा हजेरी लावली असली तरी कृषी विभागाच्या नियोजनबद्ध कामामुळे पेरणीची कामे वेगाने पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात विविध पिकांसाठी निर्धारित 7.52 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 7.16 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून एकूण 95 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी सूचना जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली.
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : कृषी विभागाच्या सहसंचालक कार्यालयात आयोजित 2026-27 या आर्थिक वर्षातील विविध कृषी व संलग्न विभागांच्या योजनांच्या जिल्हास्तरीय आढावा समिती बैठकीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 37 हजार 543 क्विंटल बियाण्यांची मागणी होती. त्यानुसार 37 हजार 267 क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत 31 हजार 669 क्विंटल बियाण्यांचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले आहे. सध्या 5 हजार 598 क्विंटल बियाण्यांचा साठा उपलब्ध असून पुढील काळात बियाण्यांची कोणतीही कमतरता भासणार नाही. शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते व इतर कृषी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आत्मा, कृषीभाग्य, हायटेक हार्वेस्टर हब, कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कर्नाटक शेतकरी समृद्धी योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, पीक विविधीकरण, कडधान्यांतील आत्मनिर्भरता, तसेच व्हीबी-जी राम जी योजनेसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या.
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानामुळे जमिनीची सुपिकता वाढण्याबरोबरच उत्पादन खर्चात घट होऊन शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढण्यास मदत होते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात 7 हजार 48 शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यात आले असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. ही योजना अधिक व्यापक करण्यासाठी जिल्ह्यातील 12 क्लस्टरमध्ये इच्छुक शेतकऱ्यांची निवड करून कृषी सखीच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्याची सूचना शिंदे यांनी दिली.
फलोत्पादन, पशुसंवर्धन, बँकांचा समन्वय आवश्यक
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि इतर योजनांद्वारे अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत अनुदान पोहोचविण्याबरोबरच बागायत पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शेतकऱ्यांना बँकांकडून वेळेत कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी बँका व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
पावसाची तूट तरीही खतांचा मुबलक साठा
कृषी विभागाचे सहसंचालक एच. डी. कोळेकर म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत 354 मि.मी. सरासरी पावसाच्या तुलनेत 341 मि.मी. पाऊस झाला असून सुमारे चार टक्के पावसाची तूट आहे. तरीही खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या 2 लाख 50 हजार 736 मेट्रिक टन खतांच्या तुलनेत 2 लाख 87 हजार 370 मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. यापैकी 1 लाख 52 हजार 776 मेट्रिक टन खतांचे वितरण करण्यात आले असून सध्या 1 लाख 34 हजार 594 मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय राखीव साठा योजनेंतर्गत 8,408 मेट्रिक टन युरिया व 1,265 मेट्रिक टन डीएपी खताचा साठा करण्यात आल्याने आगामी काळातही खतांचा तुटवडा भासणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत 2026-27 च्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माहितीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जि. पं. योजना संचालक रवी बंगारप्पनवर, फलोत्पादन खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात 95 टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण
31,669 क्विंटल बियाण्यांचे वितरण
2.87 लाख मेट्रिक टन खतांचा पुरवठा