पोस्ट कर्मचाऱ्यांना कॅशलेस उपचार उपलब्ध करून द्या
पोस्ट कर्मचारी संघाची खासदारांकडे मागणी
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
सेंट्रल गव्हर्न्मेंट हेल्थ स्कीम (सीजीएचएस) अंतर्गत केले जाणारे उपचार हे पूर्णत: कॅशलेस करावेत, अशी मागणी बेळगाव पोस्ट विभागाच्यावतीने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. उपचार पूर्णत: कॅशलेस झाल्यास कर्मचाऱ्यांना होत असणारा आर्थिक भुर्दंड कमी होणार असल्याने याबाबत बेळगावमध्ये तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.
सीजीएचएस अंतर्गत सध्या उपचार केल्यानंतर कर्मचाऱ्यांना 60 ते 70 टक्केच परतावा मिळत आहे. यामुळे पोस्ट कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसात होत आहे. मुंबई, पुणे, बेंगळूर यासारख्या मोठ्या शहरात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना कॅशलेस उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. याच धर्तीवर बेळगावमध्येही ही प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.
कॅशलेस शक्य नसल्यास हुबळी, धारवाड व कोल्हापूरच्या धर्तीवर हॉस्पिटलची व्यवस्था करावी. कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक व हुबळीचे खासदार व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दोन्ही जिल्ह्यांसाठी हॉस्पिटल सुरू केले आहे. किमान या धर्तीवर बेळगावमध्ये सेवा पुरविण्याची मागणी करण्यात आली. केवळ पोस्टच नाही तर रेल्वे व लष्करात इतर कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
खासदार जगदीश शेट्टर यांनी कर्मचाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन बेळगावचे सेक्रेटरी रवि पाटील, किशोर देशपांडे, भरमा तळवार, एम. व्ही. सोनक्की, एस. आर. पाटील, सुनील सुनगार, दशरथ रमेश एम., रघु एस., महादेवी जे., गीता बी., सृष्टी यासह इतर उपस्थित होते.