For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुतगा-कंचवीरनगर येथील सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था करा

12:21 PM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुतगा कंचवीरनगर येथील सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था करा
Advertisement

 नवीन गटार बांधण्याची रहिवाशांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : गेल्या 30 वर्षांपासून मुतगा येथील कंचवीरनगरमधील शेकडो कुटुंबे कायमस्वरुपी सांडपाणी व्यवस्थेअभावी गंभीर समस्यांना सामोरे जात आहेत. परिसरात भूमिगत गटार व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे घरांमधून बाहेर पडणारे सांडपाणी रस्त्यांवरून वाहत असून, अनेक ठिकाणी तलावाप्रमाणे साचत आहे. परिणामी परिसरात अस्वच्छता वाढली असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. तसेच आरोग्याचा धोकाही निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नवीन गटार निर्माण करावी, अशी मागणी रहिवाशांतून करण्यात आली. याबाबतचे निवदेन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. गेल्या तीन दशकांहून अधिककाळ सांडपाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

तसेच डास, माशा व इतर किटकांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, कॉलरा यासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या 30 वर्षांत ग्रा. पं., स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडे अनेकवेळा निवेदने देऊनही या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना या समस्येचा सर्वाधिक फटका बसत असून आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. योग्य पायाभूत सुविधांच्या अभावामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी संबंधित विभाग, लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून परिसरासाठी नवीन गटारीची उभारणी करावी, अशी मागणीही करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Tags :

.