'जोतिबा रोड’ नावाने रेल्वे थांबा करा
कोल्हापूर :
रेल्वे प्रशासनाकडून कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. या मार्गावरील कुशिरे तर्फ ठाणे-केर्ली दरम्यान जोतीबा रोडवर जोतिबा रोड नावाने रेल्वे स्टेशन करावे, अशा मागणीचे निवेदन रेल्वे पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांना पन्हाळा तालुक्यातील कुशिरे तर्फे ठाण्याचे सरपंचासह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
रेल्वे पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी रेल्वे स्टेशन येथे कुशिर तर्फे ठाणे येथील ग्रामपंचायतीचे सरंपचासह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मागण्याचे निवेदनही दिले.
यामध्ये म्हटले आहे, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग मंजूर झाला आहे. कोल्हापूर शिये, भुये, यवलुज कळे मार्गे वैभववाडीकडे जाणार हा रेल्वे मार्ग आहे. याच मार्गावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. जोतीबा मंदिर व भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असणारा ऐतिहासिक पन्हाळागड आहे. या दोन्ही मुख्य ठिकाणी जाण्यासाठी जोतीबा रोड या नावाने रेल्वे स्टेशन करावे. यामुळे या ठिकाणासाठी देश, राज्यासह राज्या बाहेरील येणाऱ्या प्रवाशी, पर्यटकांसह भाविकांना या महत्वाच्या दोन्ही ठिकाणी जाणे सोयीची होणार आहे. तरी ‘जोतीबा रोड’ या नावाने कुशिरे तर्फ ठाणे ते केर्ली या गावांचे हद्दीतील जोतीबा रोडवर रेल्वे स्टेशन व्हावे, अशी मागणी केली. कुशिरे तर्फ ठाणेचे सरपंच बाबासाहेब माने, शिवसेना शिंदे गटाचे पन्हाळा अध्यक्ष दादासाहेब तावडे, जिल्हा अध्यक्ष भाजप किसान मोर्चाचे सुरेश बेनाडे, पोहाळे तर्फे आळतेचे उपसरपंच आनंदा राजहंस, रेल्वे प्रवासी संघटनेचे शिवनाथ बियाणी आदी उपस्थित होते.