For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डीजेवर बंदी घालण्यासाठी निर्णय घ्या!

06:58 AM Nov 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
डीजेवर बंदी घालण्यासाठी निर्णय घ्या
Advertisement

विकास आढावा बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

आमदार, खासदार निधीतून हाती घेतलेली कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. त्या बरोबरच या कामांसंबंधीचे कागदपत्रेही व्यवस्थित ठेवावीत. बेळगावचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. रोज साचणारा कचराही अधिक प्रमाणात आहे. कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी नवा घनकचरा प्रकल्प स्थापन करण्याची सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बेळगाव शहर व जिल्ह्यात डीजेवर बंदी घालण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

Advertisement

शनिवारी सुवर्ण विधानसौधमध्ये झालेल्या कर्नाटक विकास आढावा बैठकीच्या अध्यक्षपदावरुन बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले, मागील बैठकीत ठरविल्याप्रमाणे जिल्हाधिकारी व जिल्हा पंचयतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे काही खाते वाटून देण्यात आली आहेत. या खात्यांसंबंधी आढावा घेण्याचे कामही सुरु आहे. या उपक्रमामुळे प्रलंबीत कामे त्वरित पूर्ण करता येणार आहेत.

वायव्य कर्नाटक परिवहन मंडळ निगमचे अध्यक्ष राजू कागे यांनी क्षारपड जमिनीच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाबरोबरच केंद्र सरकारकडे अतिरिक्त अनुदान मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठवावे. सिंचन योजनेसाठी सबसिडी सर्व शेतकऱ्यांना मिळावी. याबरोबरच बहुग्राम पिण्याच्या पाणी योजनेची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशी मागणी केली. काही तालुक्यांना नवे बसेस सोडण्याची मागणी काही आमदारांनी केली. 300 बसेस खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच खरेदी करण्यात येणार आहे. त्यानंतर मागणीनुसार बसेस सुरु करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

राज्य वित्तसंस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलगी यांनी महिला व बालकल्याण खात्याच्यावतीने अंगणवाडी सहाय्यिका पदासाठी लवकरात लवकर भरती पूर्ण करावी. पाणी योजनांची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कत्रांटदारावर कारवाई करण्याची मागणी केली. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी आमदार व खासदार निधीचा वर्षअखेरपर्यंत समर्पकपणे वापर करावे, महसूल गावांबरोबरच लोकवस्त्यांनाही निरंतर ज्योती योजना सुरु करावी. सोयाबीन खरेदी केंद्रे सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली.

आमदार राजू शेठ यांनी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आणखी एक एमआयआर स्कॅनिंग मशिन पुरविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली. आमदार दुर्योधन एwहोळे यांनी बिर्नाळ येथील पिण्याचे पाणी योजना त्वरित पूर्ण करण्याची मागणी करतानाच पात्र बीपीएल रेशन कार्ड रद्द करु नये, अशी सूचना केली. रायबागमधील 100 खाटांच्या तालुका इस्पितळाला तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली.

आमदार गणेश हुक्केरी यांनी शेततळ्यांभोवती तारेचे कुंपण घातल्यास दुर्घटना घडणार नाहीत याकडे लक्ष वेधले. विधानपरिषद सदस्य नागराज यादव यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी वस्तिगृहात डिजिटल ग्रंथालय सुरु करण्याची मागणी केली. सरकारी शाळांच्या विकासासाठी आमदार निधीतून दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा योग्य वापर करुन वेळेत कामे पूर्ण करण्याची मागणी केली. याबरोबरच विकास आढावा बैठकीला सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी सक्तीने उपस्थित रहावे, अशी मागणी केली. या बैठकीत जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी शेततळ्यांच्या सुरक्षितते विषयी जागृती करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी खासदार प्रियांका जारकीहोळी, आमदार बाबासाहेब पाटील, विधानपरिषद सदस्य बाबासाहेब पाटील, साबाण्णा तळवार, जिल्हा गॅरंटी अमंलबजावणी प्राधिकरणाचे अध्यक्ष विनय नावलगट्टी, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे आदींसह लोकप्रतिनीधी व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

बोगस पत्रकारांवर कारवाई

विकास आढावा बैठकीत बोगस पत्रकारांवर कारवाई करण्याविषयी चर्चा झाली. तालुका पातळीवर बोगस पत्रकारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना काम करणे कठीण झाले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्या बोगस पत्रकारांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिली.

Advertisement
Tags :

.