फ्लायओव्हरसाठी समर्पक योजना तयार करा!
आमदार राजू सेठ यांची सूचना : विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक : वाढत्या वाहतुकीचे योग्य नियोजन
बेळगाव : शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महामार्गापासून चन्नम्मा सर्कलपर्यंत फ्लायओव्हर निर्माण करण्याची योजना आखली जात आहे. या मार्गावर अनेक सर्कल आणि जोडरस्ते येतात. त्या दृष्टिकोनातून समर्पक योजना तयार करावी, अशी सूचना बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी अधिकाऱ्यांना दिली. बेळगावमध्ये फ्लायओव्हर निर्माण करण्यासंबंधी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध खात्यातील अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राष्ट्रीय महामार्गापासून चन्नम्मा सर्कलपर्यंत 4.50 कि. मी. लांबीचा फ्लायओव्हर निर्माण केला जाणार आहे. या मार्गावर अनेक सर्कल आणि जोडरस्ते येतात. ही बाब ध्यानात घेऊन योजना तयार करावी. आगामी काळात वाढत्या वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यास फ्लायओव्हर योजना उपयुक्त ठरेल. संकेश्वरकडून येणारी वाहने केवळ फ्लायओव्हरवरूनच नव्हे तर सध्या असणाऱ्या सर्व्हीस रोडवरूनही शहरात येण्यासाठी मुभा द्यावी. अवजड वाहने, पादचारी यासह प्रत्येक बाबीचा विचार करूनच अत्युत्तम योजना तयार करून अंमलबजावणी करावी, अशी सूचना आमदार राजू सेठ यांनी अधिकाऱ्यांना दिली.
बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी योजनेची अंमलबजावणी आणि पूर्वतयारीविषयी माहिती दिली. बीएसएनएल, महानगरपालिका, स्मार्ट सिटी, केएसआरटीसी, पेयजल पुरवठा व इतर खात्यांनी समन्वयाने काम करून योजना योग्य पद्धतीने जारी होण्यासाठी परिश्रम घ्यावेत, अशी सूचना केली. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील विविध खात्यांची कार्यालयांचा समावेश असणारी प्रस्तावित नव्या इमारतीच्या आराखड्याच्या आमदार सेठ यांनी पाहणी केली. पार्पिंगसाठी मुबलक जागेची सुविधा निर्माण करावी, असा सल्ला राजू सेठ यांनी दिला. याप्रसंगी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि या कार्यालयाच्या आवारातील विविध खात्यांच्या मागणीनुसार आराखडा तयार करण्यात आला आहे. आणखी एका टप्प्यात बैठक घेऊन आराखडा अंतिम करण्यात येईल, असे सांगितले. याप्रसंगी डीसीपी स्नेहा, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी राजेंद्र, सा. बां. खात्याचे कार्यकारी अधिकारी सोबरद उपस्थित होते.