शहर परिसरात मकरसंक्रांत उत्साहात
‘तिळगूळ घ्या गोड बोला’चा संदेश : तिळगूळ, भाकरी, चटण्यांची रेलचेल : सुवासिनी महिलांकडून एकमेकींना वाण
बेळगाव : शहर परिसरात मकरसंक्रांतीचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ असा संदेश देत शुभेच्छा देण्यात आल्या. भाकरी, चटण्या आणि विविध भाज्यांची घरोघरी देवाण-घेवाण करण्यात आली. विशेषत: सोशल मीडियावर भोगी आणि मकरसंक्रांतीच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. शहरासह ग्रामीण भागातही मकरसंक्रांतीनिमित्त भाकरी, तिळगूळ आणि भाज्यांची देवाण-घेवाण सुरू होती. संक्रांतीनिमित्त तिळगूळ, विविध प्रकारच्या भाकऱ्या-भाज्यांना पसंती मिळाली. सुवासिनी महिलांनी एकमेकींना वाण देऊन मकरसंक्रांत साजरी केली. रंगीबेरंगी तिळगूळ, ज्वारी, बाजरी आणि भाकऱ्यांची रेलचेल पाहावयास मिळाली. रात्रीपर्यंत बालचमूंसह साऱ्यांनीच एकमेकांना तिळगूळ देऊन शुभेच्छा दिल्या. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात तिळगूळ, तयार भाकरी, चटण्या आणि इतर पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली होती. यंदा तिळगुळाच्या दरात प्रतिकिलो 10 रुपयांनी वाढ झाली आहे. 50 ते 55 रुपये किलो असणारा तिळगूळ 60 रुपये झाला आहे. शहरातील चौकाचौकांबरोबर उपनगरातीलही काही भागांत तिळगुळाची विक्री झाली. बालचमूंनी एकमेकांना तिळगूळ देऊन शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
सोशल मीडियावरही शुभेच्छा
मंगळवारी पहाटेपासून सोशल मीडियावर भोगी आणि मकरसंक्रांतीच्या शुभेच्छांचा वर्षाव पाहावयास मिळाला. स्मार्टफोनच्या माध्यमातून शुभेच्छांची देवाण-घेवाण सुरू होती.