For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयआयटीचे मोठे धोरणात्मक निर्णय

06:30 AM Sep 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
आयआयटीचे मोठे धोरणात्मक निर्णय
Advertisement

‘आयआयटी’ म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी तंत्रज्ञान-अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेने नव्यानेच दोन मोठे धोरणात्मक निर्णय घेतले असून त्याचे दूरगामी स्वरुपात परिणाम होऊ शकतात. नव्या व बदलत्या शैक्षणिक-व्यावसायिक संदर्भात आयआयटीच्या या निर्णयांचे संस्थेच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या रोजगार संधी देणाऱ्या व्यवस्थापन-कंपन्या व त्याचवेळी संस्थेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन व श्रेणी या उभयसंदर्भात परिणामकारक असल्यानेच आयआयटीच्या या निर्णयांना नवे संदर्भ व महत्त्व प्राप्त झाले आहे.

Advertisement

आ यआयटीच्या विद्यार्थ्यांची विविध प्रतिष्ठित उद्योग-व्यवसायांमध्ये रोजगार संधी मिळवून देण्यासाठी संपर्क, समन्वयाचे महत्त्वपूर्ण काम वर्षानुवर्षे करणाऱ्या ‘प्लेसमेंट पॅनेल’ने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानुसार आयआयटीच्या पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची चाचणी, मुलाखत अशी निवड प्रक्रिया पार पाडून त्याद्वारे विद्यार्थ्यांची निवड निश्चिती करणाऱ्या कंपन्या त्यांनी निवड केलेल्या विद्यार्थी-उमेदवारांना त्यांच्या निवडीचे रितसर पत्र देत असत. त्यानुसार निवड झालेले आयआयटीचे विद्यार्थी संबंधित कंपनीत रुजू होत असत. मात्र गेल्या काही वर्षात आयआयटीच्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यानुसार त्यांना पूर्व-सूचित करणाऱ्या कंपन्यांपैकी काही कंपन्या अचानकपणे व कुठलीही पूर्व सूचना न देता अशा विद्यार्थ्यांचे नेमणूक पत्र रद्द करण्याचे प्रकार घडले व त्यामध्ये वाढ पण होत गेली. या प्रकाराने विद्यार्थ्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच गोंधळ व अस्थिरतेची स्थिती निर्माण होत असे. या मुद्याची आता गंभीर दखल आयआयटीच्या प्लेसमेंट पॅनेलने घेतली असून कंपन्यांनी असे प्रकार करू नयेत, यासाठी कंपन्यांना आग्रहपूर्वक सूचित केले आहे.

या संदर्भातील महत्त्वाची बाब म्हणजे देशांतर्गत सध्या कार्यरत असणाऱ्या आयआयटीच्या 23 शिक्षण संस्था आहेत. या सर्व संस्थांच्या प्रशिक्षार्थी व विद्यार्थी प्रशिक्षण विभागांच्या उच्चस्थ मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार देशातील 10 कंपन्यांना त्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या निवडीच्या संदर्भात दिलेले निवडपत्रानुसार या विद्यार्थ्यांना ठरल्याप्रमाणे रुजू करून घेण्यास सांगितले आहे. कंपन्यांनी असे न केल्यास अशा विद्यार्थ्यांना तीन महिन्याच्या प्रस्तावित पगारा एवढी रक्कम भरपाई स्वरुपात देण्यासंबंधी सूचित करण्यात आले असून आयआयटीच्या या सूचनांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांना यापुढे आयआयटीच्या कुठल्याही संस्था वा विद्या शाखेत विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी येण्यास मज्जाव करण्यात येईल, अशी रोखठोक भूमिका यासंदर्भात घेण्यात आली आहे.

Advertisement

आयआयटीच्या मध्यवर्ती निवड मंडळाने वर नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे निवडपत्र रद्द करणाऱ्या कंपन्यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात सूचित करण्यात आलेल्या प्रमुख कंपन्यांमध्ये ओरॅकल, इंटरव्ह्यू किकस्टार्ट, सुपर एजीआय यासारख्या कंपन्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना निवडपत्र देऊनही 2026 मध्ये त्यांना निर्धारित तारखेला रुजू न करणे अथवा त्यांच्याशी यासंदर्भात कुठलाही पत्रव्यवहार न करण्याच्या अशा कंपन्यांच्या अन्याय व अरेरावी भूमिकेचा फटका आयआयटीच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांना बसला आहे.

याच्याच जोडीला विविध उद्योग कंपन्यांनी आयआयटीच्या विविध विद्याशाखांमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलाखतीवर आधारित निवड करून त्यानुसार विद्यार्थी-उमेदवारांची निवड केल्याचे अधिकृत पत्र देऊन पण अचानकपणे त्यांची निवड रद्द करण्याचे प्रकार वाढत्या प्रमाणात होऊ लागले आहेत. अशा कंपन्यांना विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्याच्या संदर्भात फेरविचार करण्याबद्दल आयआयटीच्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे सूचित करण्यात आले आहे. या कंपन्यांनी यासंदर्भात नव्याने व सकारात्मक स्वरुपात भूमिका न घेतल्यास त्यांना यापुढे विद्यार्थी उमेदवारांची निवड करण्यासाठी आयआयटीचे सहकार्य मिळणार नाही, असे त्यांना स्पष्टपणे सूचित करण्यात आले आहे.

यासंदर्भात आयआयटी मध्यवर्ती निवड प्रशिक्षण विभाग प्रमुख प्रा. जॉन जोम यांनी स्पष्ट केल्यानुसार विद्यार्थ्यांची निवड करून व त्यांना तसे नेमणूकपत्र देऊन पण अचानकपणे ते रद्द करून अशा हुशार व पात्रताधारक विद्यार्थ्यांची रोजगारसंधी हिरावणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात आयआयटीने उच्चस्तरीय दखल घेतली आहे. याच धोरणात्मक निर्णयानुसार 2026-27 या शैक्षणिक सत्रात आयआयटीची  पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊ घातलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षापूर्व मुलाखती व निवड प्रक्रियेमध्ये असे प्रकार करणाऱ्या कंपन्यांना सहभागी होऊ दिले जाणार नाही.

गेल्या सुमारे वर्षभरात विद्यार्थ्यांच्या नेमणूक पत्रांच्या काही कंपन्यांनी घेतलेल्या अकल्पित व अनाकलनीय भूमिकेच्या संदर्भात नजिकच्या भवितव्यात कंपन्यांतर्फे आयआयटीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्याच्या संदर्भात काही निर्णय आता नव्याने घेतले आहेत. यामध्ये देशांतर्गत सर्व आयआयटी संस्थांनी कंपन्यांप्रमाणेच संस्थेच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी काही सूचना व मार्गदर्शक तत्वे नव्याने जारी केले आहेत.

आयआयटी संस्थांतर्फे त्यांच्या विद्यार्थ्यांना नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार संस्थेच्या विद्यार्थ्यांना कंपन्यांशी रोजगार-संधींच्या संदर्भात व्यवहार करताना अथवा त्यांची आयआयटीच्या संदर्भातील माहिती देताना त्यांची ‘जेईई’ वा ‘गेट’सारख्या प्रवेश पात्रता परीक्षांची गुणांची टक्केवारी अथवा गुणांकाचा उल्लेख करू नये, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.

या नव्या सूचनांनुसार सर्व आयआयटीच्या विद्यार्थी प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन केंद्रातर्फे यापुढे आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अद्ययावत शैक्षणिक आलेखाच्या तपशिलातून ‘जेईई, गेट’ या सारख्या प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांक तातडीने हटवून यापुढे असा उल्लेख न करण्याचा धोरणात्मक निर्णय कळविला आहे. मुख्य म्हणजे या निर्णयाच्या मागे काही कंपन्यांकडून आयआयटी व संस्थेच्या विद्यार्थ्यांना आलेल्या अनुभवांचा उल्लेख करण्यात आला आहे. थोडक्यात व महत्त्वाचे म्हणजे आयआयटी संस्थांच्या या दोन्ही निर्णयांचे संबंधित कंपन्या व संस्थेचे विद्यार्थी या उभयतावर दीर्घगामी परिणाम होणार आहेत.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.