पंजाबमध्ये ‘आप’ला मोठा धक्का
दोन आमदारांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा : भाजपमध्ये जाण्याची चर्चा
वृत्तसंस्था, पटियाला
पंजाब विधानसभा निवडणूक 2027 साठी आम आदमी पार्टीने (आप) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाला धक्का बसला आहे. सनौरचे आमदार हरमीत सिंह पठानमाजरा आणि समाना मतदारसंघाचे आमदार चेतन सिंह जौडामाजरा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या दोघांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पठानमाजरा गेल्या काही काळापासून पक्ष नेतृत्व आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारवर टीका करत होते. सरकारशी त्यांच्यातील मतभेद आणि पक्षांतर्गत वाद आता उघडपणे राजकीय स्वरूपात समोर आला आहे. पठानमाजरा यांचे राजीनामापत्र त्यांच्या लेटरहेडवरून सोशल मीडियावर प्रसारित झाले, तर जौडामाजरा यांनीही पक्षाचा राजीनामा दिल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी माजी अकाली मंत्री सुरजीत सिंह रखडा यांना आम आदमी पार्टीत प्रवेश दिल्यानंतर त्यांची समाना मतदारसंघाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर जौडामाजरा यांची नाराजी उघडपणे चर्चेत आली होती.
पठानमाजरा आणि सरकारमधील संघर्ष
पठानमाजरा आणि सरकारमधील मतभेद सप्टेंबर 2025 मध्ये तीव्र झाल्याचे वृत्त आहे. त्या वेळी त्यांनी पूरस्थिती तसेच आपल्या मतदारसंघातील नदी-नाल्यांच्या सफाईच्या मुद्द्यावरून सरकार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांची सुरक्षा काढून घेणे आणि मतदारसंघातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतही चर्चा झाली होती.
पठानमाजरा यांच्याविरोधात कारवाई
एका महिलेच्या तक्रारीनंतर पठानमाजरा यांच्याविरोधात बलात्कार, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकीचे आरोप असलेला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांची कारवाई आणि अटकेशी संबंधित घडामोडींनंतर डिसेंबर 2025 मध्ये पटियाला न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. पठानमाजरा यांनी या कारवाईला राजकीय छळ ठरवत सरकार आणि पक्ष नेतृत्वावर टीका केली होती.आता त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे 2027च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीसमोर नवे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.
