व्होडाफोन-आयडियाला मोठा दिलासा
एसबीआयच्या नेतृत्वाखाली बँक 3.5 अब्ज डॉलर्सचे मोठे कर्ज देणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली दूरसंचार कंपनी वोडाफोन आयडिया चर्चेत आहे. कंपनीला आपले नेटवर्क सुधारण्यासाठी आणि व्यवसाय पुन्हा मजबूत करण्यासाठी सुमारे 3.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 31,000 कोटी रुपयांचे कर्ज मिळू शकते. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचा एक गट कंपनीला ही रक्कम देण्यास तयार आहे.
या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या हवाल्याने आलेल्या वृत्तानुसार, या गटामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट म्हणजेच एनएआयबीएफआयडी यांचाही समावेश आहे. तथापि, या प्रकरणी वोडाफोन आयडिया आणि बँकांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सुमारे 10 वर्षांच्या या कर्जाला काही अटी जोडल्या आहेत. एक महत्त्वाची अट कुमार मंगलम बिर्ला यांच्याशी संबंधित आहे.अहवालानुसार, कुमार मंगलम बिर्ला हे कर्जाच्या संपूर्ण कालावधीत व्होडाफोन आयडियाचे अध्यक्ष राहतील. याशिवाय, जर कंपनीने कर्जाची परतफेड केली नाही, तर पेमेंटसाठी हमीची अटही ठेवण्यात आली आहे. तथापि, कंपनी आणि बँकांनी या अटी आणि कर्जाबद्दल अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.
दीर्घकाळापासून कर्ज वसुलीचा प्रयत्न
व्होडाफोन आयडिया बऱ्याच काळापासून बँकांकडून निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी मे महिन्यात, एका संस्थेच्या अहवालानुसार कंपनी कर्जासाठी बँकांशी चर्चा करत असून, कर्ज देणाऱ्या बँकांच्या गटाचे नेतृत्व एसबीआय करू शकते.
सरकारकडूनही मोठा दिलासा
व्होडाफोन आयडियाला अलीकडच्या काळात सरकारकडून मोठा आधारही मिळाला आहे. यावर्षी सरकारने कंपनीला देय असलेल्या स्पेक्ट्रम पेमेंटवर मर्यादा घातली, ज्यामुळे कंपनीला भविष्यातील दायित्वे हाताळणे सोपे झाले आहे. यापूर्वी, सरकारने कंपनीची सुमारे 37,000 कोटी रुपयांची थकबाकी शेअर्समध्ये रूपांतरित केली होती. यानंतर, व्होडाफोन आयडियामधील सरकारचा हिस्सा 22.6 टक्क्यांवरून 48.99 टक्क्यांपर्यंत वाढला.
किती पैशांचा वापर केला जाईल?
वोडाफोन आयडिया बऱ्याच काळापासून आपले नेटवर्क मजबूत करण्यासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, कंपनी आपल्या नेटवर्कमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्जातून मिळणाऱ्या रकमेचा काही भाग वापरणार आहे. व्होडाफोन आयडिया ही ग्राहकांच्या संख्येनुसार देशातील तिसरी सर्वात मोठी मोबाईल कंपनी आहे, पण तरीही ती तोट्यात आहे. बाजारात तिची स्पर्धा मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलशी आहे. त्यामुळे नेटवर्कवर अधिक खर्च केल्यास कंपनीला आपली स्पर्धात्मक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते.