रेमिटन्स करात मोठी कपात होणे शक्य
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेत काम करणाऱ्या इतर देशांच्या नागरीकांकडून त्यांच्या देशात पाठविल्या जाणाऱ्या पैशांवर कर लावण्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे धोरण आहे. त्यानुसार अमेरिकेने अशा पैशांवर 3.5 टक्के कर आकारण्याची घोषणा काही काळापूर्वी केली होती. मात्र, आता या करात मोठी कपात होणार असून हा कर 1 टक्का करण्यात येत आहे. त्यामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या लक्षावधी भारतीय नागरीकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अमेरिकेतून भारताला प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात पैसे (रेमिटन्स) पाठवले जातात. त्यावरील कर कमी करण्याचा प्रस्ताव असल्याने भारतीय नागरीकांची भविष्यकाळात मोठी सोय होणार आहे.
अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींनी हा कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा प्रकारचे विधेयक सभागृहांमध्ये सादर करण्यात आले आहे. त्याला दोन्ही पक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आता हा कर लवकरच कमी होणार आहे. इतकेच नव्हे तर हा कर जे पैसे रोखीने, मनीऑर्डरने किंवा डिमांड ड्राफ्टने (कॅशियर्स चेक) पाठविले जातील, त्यांच्यावरच राहणार आहे. बॅक खाती आणि इतर वित्तसंस्थांमधील खाती यांच्या माध्यमातून पाठविल्या जाणाऱ्या पैशाला करातून मुक्तता देण्याची तरतूदही या विधेयकात आहे. हे विधेयक अमेरिकेच्या दोन्ही लोकप्रतिनिधीगृहांमध्ये संमत होईल असे निश्चितपणे मानण्यात येत आहे.