For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रुपयाच्या किमतीत मोठी सुधारणा

06:15 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
रुपयाच्या किमतीत मोठी सुधारणा
Advertisement

1.88 रुपयांचा वधार, 12 वर्षांमधील विक्रम

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

गेले बरेच दिवस सातत्याने घसरणारा रुपया आता बराच सावरला आहे. गुरुवारी दिवसअखेर त्याची किंमत डॉलरच्या तुलनेत 92.82 रुपये इतकी झाली. त्याआधी त्याची घसरण जवळपास 95 रुपयांपर्यंत झाली होती. आता त्याच्या किमतीत 1 रुपया 88 पैशांची सुधारणा झाली आहे. गुरुवारच्या व्यवहारांमध्ये एका क्षणी त्याची सुधारणा 1.98 रुपये इतक्या पातळीवर पोहचली होती. तथापि, नंतर दिवसअखेर दरात 10 पैशांची घसरण होऊन तो 92.88 रुपयांवर स्थिरावला.

Advertisement

एका दिवसाच्या काळात रुपयाच्या किमतीमध्ये इतका वधार होणे, हा गेल्या 12 वर्षांमधील विक्रम आहे. सोमवारी रुपया 94.70 या किमतीवर होता. चलन बाजारात डॉलरची आवक होण्याचे प्रमाण वाढल्याने रुपयाही वधारला. स्पिक्युलेटिव्ह व्यवहारांच्या वाईंडिंग प्रक्रियेत ही पतवाढ झाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर 2013 पासूनची ही रुपयाच्या दरातील सर्वाधिक सुधारणा मानण्यात येते.

रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न

गेल्या दोन आठवड्यांमध्ये रुपयांची वेगाने घसरण होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर, रिझ्ा़र्व्ह बँकेने ही पतघसरण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली. भारताच्या या मध्यवर्ती बँकेने ‘रुपी नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्डस्’ (एनडीएफ) व्यवहारांवरील निर्बंध अधिक कठोर केले. तसे निर्देश असे व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना देण्यात आले आहेत. तसेच ‘आर्बिट्रेज अपॉर्चुनिटीज’ आणि स्पिक्युलेटिव्ह व्यवहारांवरही अधिक कडक निर्बंध घालण्यात आले आहेत, असे स्पष्ट केले गेले.

अद्यापही धोका आहेच

रुपया सावरला असला, तरी अद्यापही स्थिती पूर्ण सुधारलेली नाही. कच्च्या इंधन तेलाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये रुपयावरचा दबाव वाढीला लागू शकतो. तेलदर आता प्रतिबॅरल 106 डॉलर्स इतके आहेत. हे दर या युद्धाचा प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत जवळपास दुप्पट वाढले आहेत.

‘एनडीएफ’ म्हणजे काय...

भारतीय रुपयाचा उपयोग करुन विदेशात डेरिव्हेटिव्ह व्यवहारांची रोखीने पूर्तता करणे याला ‘रुपी नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्डस्’ किंवा एनडीएफ असे म्हणतात. हे व्यवहार इतर देशांचे चलन अनुमानित दरात खरेदी करण्याचे करार करण्यासाठी केले जातात. विदेशी चलन दराचे अनुमान चुकल्यास रुपयाची किंमत घसरते. आता पुढचे काही दिवस रिझर्व्ह बँकेने अशा व्यवहारांसाठी निवासी किंवा अनिवासी भारतीयांना पैसे देण्यास बँकांना बंदी घातली आहे. याचा परिणाम म्हणून रुपयाचे स्पिक्युलेटिव्ह (अनुमानावर आधारित) व्यवहार थांबले आहेत. परिणामी, रुपया देशाबाहेर जाण्याचा वेग मंदावल्याने त्याचा दर वधारला आहे.

या आठवड्यातील रुपयाची हालचाल

सोमवार दिवसअखेर 94.81

बुधवार दिवसअखेर  93.70

गुरुवार दिवसअखेर 92.88

(मंगळवारी सुटी असल्याने व्यवहार नव्हते.)

Advertisement
Tags :

.