For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यात मोठे राजकीय बदल

07:00 AM Jun 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये राज्यात मोठे राजकीय बदल
Advertisement

सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांचे भाकित : राजकीय वर्तुळात कुतूहल

Advertisement

बेंगळूर : राज्य काँग्रेसमधील काही मंत्री, आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. दरम्यान, सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात राज्य राजकारणात मोठे बदल होतील, असे भाकित केले आहे. त्यामुळे कुतूहल निर्माण झाले आहे. विधानसौध येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री के. एन. राजण्णा यांनी राज्य राजकारणात आश्चर्यकारक बदल होतील, असे सांगितले. 2013 ते 2018 पर्यंत राज्यात एकच पॉवर सेंटर होते. मात्र, आता पॉवर सेंटर वाढले आहेत. 2013 मध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर कोणतेही दडपण नव्हते. पॉवर सेंटर वाढल्याने मुख्यमंत्र्यांवरील दडपण वाढले आहे. गॅरंटी योजनांमुळे राज्य सरकारवरील आर्थिक भारही वाढला आहे, असे ते म्हणाले.

अनुदान मिळाले नाही, असे म्हणणे चुकीचे

Advertisement

राज्यभरात विविध कामांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या चालना देत आहेत. अनुदान नसते तर कामांचा शुभारंभ झाला असता का?. मागणीनुसार अनुदान न मिळाल्याने आमदारांमध्ये नाराजी असू शकते. निधीच्या उपलब्धतेनुसार कोणताही भेद न करता मतदारसंघांच्या विकासासाठी अनुदान मिळत आहे. मतदारसंघाला अनुदान मिळाले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे.

वर्षअखेरीस किरकोळ बदल : सतीश जारकीहोळी

यंदाच्या वर्षअखेरीस किरकोळ बदल होतील. कोणतेही मोठे बदल होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया देऊन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री बदलणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी मी प्रयत्न चालविलेले नाहीत. प्रयत्न चालविले असते तर ते पुढे सुरू ठेवले असते. मी जिथे आहे, तिथेच आहे. मला मागून पाठिंबा देणारे कोणीच नाहीत ना!, असे ते मार्मिकपणे म्हणाले.

Advertisement
Tags :

.