For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलिसांची मोठी कारवाई; 4 बंदुका, 3 जिवंत काडतुसे आणि 1 किलो खवले मांजराची खवले जप्त

पोलिसांची मोठी कारवाई  4 बंदुका  3 जिवंत काडतुसे आणि 1 किलो खवले मांजराची खवले जप्त
Advertisement

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील देवसू गावात सावंतवाडी पोलिसांनी मंगळवारी पहाटे मोठी कारवाई करत 4 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या खवले मांजराची सुमारे 1 किलो खवले, 4 बंदुका आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Advertisement

सावंतवाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देवसू गावात ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी पहाटे सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने एकाच वेळी चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान काडतुसे तसेच ठाचणीच्या बंदुकांचा समावेश असलेल्या 4 बंदुका पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

तसेच कारवाईत अन्य बेकायदेशीर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये 3 जिवंत काडतुसे आणि खवले मांजराची 1 किलो खवले यांचा समावेश आहे. खवले मांजर हा दुर्मिळ वन्यजीव असून, त्याच्या अवयवांची अवैध तस्करी केली जात असल्याच्या संशयातून पोलिसांनी ही कारवाई केली.

Advertisement

या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने केली. या धडक कारवाईमुळे देवसू गावासह परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच वन्यजीवांच्या अवयवांच्या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Advertisement
Tags :

.